साताऱ्यात सैनिक कल्याण विभागातर्फे २५ वा कारगिल विजय दिवस साजरा
सातारा,(भूमिशिल्प वृत्तसेवा): सैन्यदल,माजी सैनिक,शहिदांच्या कुटुंबीयांच्या कल्याणासाठी राज्य शासन सदैव कटिबध्द आहे. ज्या शहिदांच्या परिवारांना अद्यापही जागा मिळाली नाही.त्यांच्या जागेचा प्रश्न येत्या २७ ऑगस्ट या शहिद गजानन मोरे यांच्या हुतात्मा दिनाच्या पुर्वी मार्गी लावू, या विषयासाठी मंत्रालय स्तरावर आढावा घेऊ व या परिवारांना लवकरात लवकर जागा मिळवून देण्यासाठी कसोशिने प्रयत्न करू अशी ग्वाही पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिली.
साताऱ्यातील जिल्हा परिषदेच्या स्वर्गीय यशवंतराव चव्हाण बहुउद्देशिय सभागृहात सैनिक कल्याण विभागातर्फे २५ वा कारगिल विजय दिवस पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या अध्यक्षतेखाली साजरा करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी सैनिक कल्याण विभागाचे राज्याचे संचालक ब्रिगेडियर (निवृत्त) राजेश गायकवाड, भारतीय सेना दलाचे निवृत्त जनरल विजय पवार, जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी, मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, सैनिक कल्याण विभागाचे उपसंचालक (ले.क.निवृत्त) आर.आर.जाधव, कर्नल सतीश हंगे जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी पुणे, लेफ्टनंट कर्नल भीमसेन चवदार जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी सांगली, मेजर आनंद पाथरकर जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी सातारा, माजी उपनगराध्यक्ष शंकर माळवदे यांची प्रमुख उपस्थिती होती.
कारगिल युध्दातील राज्यातील हुतात्म्यांच्या वारसांचा, युध्दात अपंगत्व आलेल्यांचा तसेच शौर्यपदक प्राप्त अधिकारी व जवानांचा यावेळी पालकमंत्री देसाई यांच्या हस्ते धनादेश, स्मृतीचिन्ह व शाल देवून गौरव करण्यात आला.
पालकमंत्री शंभूराज देसाई म्हणाले, सातारा जिल्हा हा सैनिकांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. देशाची सेवा करत असताना अनेकांनी हौतात्म पत्करले, अंपगत्व पत्करले आहे. आपले जवान छातीचा कोट करुन परकीय शक्तीची आक्रमणे परतवून लावत असतात. वर्दीधारी जवान, २४ × ७ देशांच्या सीमांचे रक्षण करत असतात. त्यामुळेच आपण देशबांधव सुरक्षित राहतो. सैनिकांचा कणखरपणा हीच त्यांची ओळख आहे त्यांचा आदर्श घेवून त्यांच्याप्रती गौरव आणि सन्मानाची भावना जोपासणे हे आपले कर्तव्य आहे.
यावेळी पालकमंत्री देसाई यांनी येणाऱ्या १५ ऑगस्ट पासून वॉर मेमोरियलला १५ ऑगस्ट, २६ जानेवारी व १ मे या दिवशी अभिवादन करण्याची प्रथा जिल्ह्यात सुरू करणार असल्याची ग्वाही यावेळी दिली.
या कार्यक्रमास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे येणे नियोजित होते तथापि दिल्ली येथे महत्त्वाची बैठक असल्याने आणि खराब हवामानामुळे कराड येथे विमान उतरण्यात अडथळा निर्माण होईल असे यंत्रणेकडून सांगण्यात आल्याने त्यांना या ठिकाणी येता आले नाही, असे स्पष्ट करुन पालकमंत्री देसाई यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दुरध्वनीद्वारे संपर्क करुन दिला.
यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कारगिल युध्दातील हुतात्म्यांचे वारस माजी सैनिक, कार्यरत सैनिक अशा सर्वांना कारगिल विजय दिनाच्या शुभेच्छा देवून हा दिवस अभिमान आणि गौरवाचे प्रतिक असल्याचे सांगितले. या युध्दात ज्यांनी हौतात्म पत्करले, ज्यांना अपंगत्व आले अशा सर्वांच्या प्रती राज्य सरकार सदैव कृतज्ञ आहे. सर्व देश त्यांच्या पाठीशी आहे असे सांगून सातारा जिल्हा हा सैनिकांचा जिल्हा आहे. आपल्याला मनापासून याचा अभिमान आहे.जिल्ह्यातील सैनिकांचे नाव धारण केलेल्या मिलिटरी अपशिंगी या गावाच्या विकासकामांना प्राधान्य देण्यात येईल असे सांगितले. शासनाने माजी सैनिकांसाठी महामंडळ स्थापण्याचा निर्णय केला आहे. मुंबईमध्ये युध्द संग्रहालयही उभारण्यात येणार आहे. तसेच सैनिकांच्या व माजी सैनिकांच्या कल्याणासाठी संपूर्ण कटिबध्द असून त्यादृष्टीने अनेक निर्णय घेण्यात येत आहेत.
यावेळी सैनिक कल्याण विभागाचे संचालक राजेश गायकवाड यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना कारगिल युध्दाने देशाला शौर्याची एक नवीन गाथा दिली, या युध्दात अनेक वीर जवानांनी आहुती दिली.या कठीण काळात सैनिकांनी दिलेले बलिदान चिरस्मरणीय राहील, असे सांगून सैनिकांच्या कल्याणासाठी शासन राबवित असलेल्या विविध योजना,उपक्रम याबद्दल माहिती दिली.
कार्यक्रमापुर्वी पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी शहिद कर्नल संतोष महाडिक यांना स्मृती उद्यानात पुष्पचक्र अर्पण करुन अभिवादन केले.
या कार्यक्रमात वीरमाता कालिंदी महाडिक, वीरपत्नी उज्वला निकम, वीरपत्नी विद्या सानप यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे आभार आर.आर. जाधव यांनी मानले.
You must be logged in to post a comment.