‘मी नाही तू’ करत पुन्हा ग्रेडसेप्रेटरचे उदघाटन

सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) : मागील काही दिवसांपूर्वी सातारा येथील पोवई नाक्यावर उभारण्यात आलेल्या ग्रेडसेप्रेटरचे भाजपचे खासदार उदयनराजे भोसले यांनी अचानक उद्घाटन केले. त्यानंतर आज पुन्हा शासकीय उद्घाटन कार्यक्रम पार पडला. यावेळी फित कोणी कापायची यावरून ‘मी नाही तू’ करत अखेर विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांच्या हस्ते कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमास सहकारमंत्री तथा पालकमंत्री बाळासाहेब थोरात, गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई, खासदार श्रीनिवास पाटील, आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले व शशिकांत शिंदे उपस्थित होते.

सातारा शहरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न सोडविण्यासाठी पोवई नाक्यावर ग्रेडसेप्रेटरचे काम सुरू झाले. तीन वर्षांपूर्वी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शरद पवार यांच्या उपस्थितीत भूमिपूजन करण्यात आले. तेव्हापासून काम सुरू होती. या काळात शहरात वाहतूक कोंडीचा मोठा प्रश्न निर्माण झाला होता. तीन वर्षानंतर हे काम पूर्ण केल्यानंतर काही दिवसांपूर्वी या पुलाची पाहणी करण्यासाठी आलेल्या भाजपचे खासदार उदयनराजे भोसले यांनी अचानक उद्घाटन केले. त्यामुळे जिल्ह्यात उलटसुलट चर्चा सुरू होती. यावेळी या प्रकल्पातून वाहतूकही सुरू करण्यात आली.

दरम्यान, जिल्हा प्रशासनाच्यावतीने आज पुन्हा उद्घाटन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. त्यास सर्व लोकप्रतिनिधींना निमत्रंण देण्यात आले होते. सकाळी ११ वाजता विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर, गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई, खासदार श्रीनिवास पाटील, शिवेंद्रसिंहराजे भोसले, शशिकांत शिंदे, जिल्हाधिकारी शेखर सिंग उपस्थित होते. पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांना येण्यास उशीर झाला. ते घाईत कार्यक्रमस्थळी आल्यानंतर ना. पाटील यांनी उद्घाटन करावे, असे रामराजेंनी सुचवले. पण त्यांनी नकार देऊन तुम्हीच करा असे सांगितले. ‘मी नाही तू’ असे करत असताना खासदार पाटील यांनी रामराजेंच्या हातात कात्री दिली. त्यानंतर त्यांनी फित कापली. यावेळी खासदार उदयनराजे भोसले यांनी गैरहजेरी लावली होती.

error: Content is protected !!