सातारा, भूमिशिल्प वृत्तसेवा : कोरेगाव तालुक्यामधील बोधेवाडी ग्रामपंचायतीची निवडणूक बिनविरोध झाली आहे. ग्रामस्थांनी एकमताने ग्रामपंचायत सदस्य निवडून दिले. त्यानंतर सर्व सदस्यांनी बहुमताने सरंपच व उपसरपंच यांचीही निवड केली. गावातील ग्रामस्थांनी गावात एकी राहावी तसेच गाव सुखी राहावे यासाठी ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध करण्याचा पायंडा सुरू केला. गावाच्या विकासासाठी ग्रामस्थांनी ही संकल्पना राबवली असून या पंरपरेमुळे गावातील सलोखा व एकोपा टिकून आहे.
पाच वर्षांपूर्वी बोधेवाडी गावात देखील ग्रामपंचायत निवडणुकीत चुरस पाहायला मिळायची. या निवडणुकीत भाऊबंदकी उफाळून मोठ मोठे वाद होत होते. या सर्व वादांमुळे गावाचा विकास देखील खुंटला होता. हा सर्व प्रकार गावातील तरुण व समजूतदार ग्रामस्थांच्या लक्षात आल्यावर त्यांनी एकत्र बसून गावाच्या विकासासाठी तसेच वाद- विवाद टाळण्यासाठी ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध करण्याचा निर्णय घेतला.
गावातील प्रत्येक समाजातील व्यक्तीला प्रतिनिधित्वाची संधी दिल्याने स्पर्धा, हेवेदावे झाले नाहीत. यंदाच्या निवडणुकीत ग्रामपंचायतीच्या सात जागांसाठी केवळ सातच अर्ज आल्याने निवडणूक बिनविरोध झाली आहे. त्यानंतर सरपंचपदी नारायण बोधे व उपसरपंचपदी सुर्यकांत माने यांची निवड झाली. निवड झालेल्या सरपंच, उपसरंपचांचे उषा साळुंखे, कल्याणी बोधे, मालन सस्ते, रुक्मिणी माने यांनी सत्कार केला. यावेळी प्रशांत बोधे, अमोल बोधे, अमित बोधे, जितेश बोधे, चंद्रशेखऱ माने व ग्रामस्थ उपस्थित होते.
You must be logged in to post a comment.