सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) : सातारा आणि जावली तालुक्यातील बहुतांश ग्रामपंचायतीवर आ. शिवेद्रसिंहराजे भोसले गटाने निर्विवादीत सत्ता मिळवली. निकालानंतर विजयी उमेदवार आणि कार्यकर्त्यांनी सुरुची येथे जल्लोष साजरा केला होता. निकालाच्या दुसऱ्या दिवशीही सातारा आणि जावली तालुक्यातील अनेक ग्रामपंचायतीचे विजयी उमेदवार, पॅनल प्रमुख आणि ग्रामस्थांनी सुरुची निवासस्थानी गर्दी केली. आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी विजयी उमेदवार, पॅनल प्रमुख आणि ग्रामस्थांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. .
सातारा व जावली तालुक्यातील जनतेने नेहमीच मला पाठबळ दिले आहे. ग्रामपंचायत निवडणुकीतही मतदार बंधू आणि भगिनींनी माझ्या विचाराच्या गटाची सत्ता आपापल्या गावामध्ये आणली. याबद्दल मी सातारा आणि जावली तालुक्यातील जनतेचा आभारी आहे. नेहमीप्रमाणे प्रत्येक गावातील प्रश्न सोडवण्यासाठी प्राधान्य देणार असून नवनिर्वाचित सदस्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहून गावाचा सर्वांगीण विकास करू आणि ग्रामस्थांचा विश्वास सार्थ ठरवू, असे आश्वासन आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी दिले.
सकाळी ९ पासूनच विजयी उमेदवार, पदाधिकारी आणि ग्रामस्थांनी सुरुची येथे गर्दी करण्यास सुरुवात केली. सातारा व जावली तालुक्यातील शिवथर, नेले, सनपाने, बोरगाव, काळोशी, सर्जापूर, हमदाबाज, मायनी- वेळेढेंन, भिवडी, वेळे, सारखळ, शेळकेवाडी, सरताळे, इंगळेवाडी, सोनवडी, फडतरवाडी, बामणोली कसबे, शेंबडी, उंबऱ्याचीवाडी, आपटी, खोडद, करंडी, कण्हेर, पाडळी, सासपडे, राकुसलेवाडी आदी ग्रामपंचायतीचे विजयी उमेदवार, पॅनल प्रमुख, कार्यकर्ते आणि ग्रामस्थांनी आ. शिवेंद्रसिंहराजे यांची भेट घेतली. आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी विजयी उमेदवारांचा कंदी पेढा भरवून अभिनंदन केले. निवडणूक झाली, निकाल लागला आता कामला लागा. गटतट न मानता गावाचा सर्वांगीण विकास करा आणि मतदारांनी तुमच्यावर टाकलेला विश्वास सार्थ ठरवा असे आवाहन करतानाच प्रत्येक गावच्या विकासासाठी नवनिर्वाचित सदस्यांना सर्वोतोपरी सहकार्य करू, असा शब्द आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी यावेळी दिला.
You must be logged in to post a comment.