गावागावात प्रशासनाची करडी नजर

जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी ग्रामपंचायत निवडणुक नियोजनाचा आढावा घेतला

सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) : जिल्ह्यात ग्रामपंचायतींच्या निवडणुका शांततेत, सुरळीत व निर्भयपणे पार पाडाव्यात. यासाठी  जिल्हा परिषद, राज्य उत्पादन शुल्क, नेमवलेल्या नोडल अधिकऱ्यांनी आपले कर्तव्य करावे. या कामात हलगर्जीपणा करू नये अशा सूचना जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी केल्या.

जिल्हाधिकारी यांच्या दालनात ग्रामपंचायत निवडणुकीबाबत बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी जिल्हाधिकारी शेखर सिंह बोलत होते. या बैठकीला अपर जिल्हाधिकारी रामचंद्र शिंदे, निवासी उपजिल्हाधिकारी सुनिल थोरवे, उपजिल्हाधिकारी (महसूल) किर्ती नलवडे आदी उपस्थित होते.

कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, मतमोजणीच्या ठिकाणी तसेच आचार संहितेचे कोटेकोरपणे पालन होण्यासाठी पोलीस विभागाने चोख पोलीस बंदोबस्त ठेवावा, अशा सूचना करुन जिल्हाधिकारी शेखर सिंह पुढे म्हणाले, ज्या शाळांमध्ये ग्रामपंचायत निवडणुकीचे मतदान होणार आहे तेथे कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर योग्य ती खबरदारी घ्यावी. मतदानाच्या ठिकाणी जिल्हा परिषदेमार्फत रॅम्प, लाईट, पाणी तसेच फर्निचर तुटले असेल तर ते तात्काळ दुरुस्त करावे. तसेच ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये जास्तीत जास्त मतदान व्हावे यासाठी  शिक्षणाधिकारी यांच्या कार्यालयाकडून निवडणूक लागलेल्या ग्रामपंचायतींमध्ये मतदानाविषयी मोठ्या प्रमाणात जनजागृती करावी.

कुठेही अवैधपणे मद्याचे वाटप होणार नाही यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाने भरारी पथके कार्यान्वीत करावी. मतदानाच्या पेट्या मतमोजणीच्या ठिकाणी नेहण्यासाठी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाकडून बसेस उपलब्ध करुन करण्याबाबतचे नियोजन करावे, अशा सूचनाही त्यांनी शेवटी केल्या.

error: Content is protected !!