जिल्ह्यात डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना मान्यवरांकडून अभिवादन

महापरिनिर्वाण दिनी लोटला जनसागर; विविध कार्यक्रमांचे आयोजन

सातारा,(भूमिशिल्प वृत्तसेवा) : भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनी त्यांना अभिवादन करण्यात आले.यानिमित्त जिल्ह्यात ठिकठिकाणी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. महापरिनिर्वाण दिनी महामानवाला अभिवादन करण्यासाठी शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरात दिवसभर मान्यवर व अनुयायींची वर्दळ सुरू होती. दरम्यान, सायंकाळी आमने बंगला ते रमाई स्मारकापर्यंत कँडल रॅली काढण्यात आली.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपले संपूर्ण आयुष्य बहुजनांच्या उद्धारासाठी खर्ची घातले. त्यांनी शिक्षणासाठी, समाजाच्या कल्याणासाठी आयुष्यभर संघर्ष केला, शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा, असा गुरुमंत्र त्यांनी दिला असे असामान्य व्यक्तिमत्त्व ६ डिसेंबर १९७६ रोजी पंचतत्त्वात विलीन झाले. तेव्हापासून ६ डिसेंबर रोजी महामानवाला अभिवादन केले जात आहे. शुक्रवारी बाबासाहेबांच्या ६८ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त त्यांना ठिकठिकाणी अभिवादन करण्यात आले.

सातारा शहरातील शाहू चौकातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याला विविध मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. महापरिनिर्वाण दिनाच्या पूर्वसंध्येला प्रार्थनेसह विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. पुतळा परिसरात विद्युत रोषणाई करण्यात आली होती. महापरिनिर्वाण दिनी महामानवाला शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरात दिवसभर अनुयायींची वर्दळ सुरु होती. बहुजन समाज संघटना व आंबेडकर अनुयायींच्यावतीने जिल्ह्यातही ठिकठिकाणी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. सर्व शासकीय कार्यालये तसेच शाळा महाविद्यालयांमध्ये बाबासाहेब आंबेडकर यांना महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन करण्यात आले.

रिपाइंचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष अशोक गायकवाड, अण्णा वायदंडे, किशोर गालफाडे, युवराज कांबळे,पूजा बनसोडे,आप्पा तुपे, अक्षय कांबळे, राजू कांबळे आदी मान्यवरांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन केले.

दरम्यान, डॉ बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीतर्फे सायंकाळी सदरबझार येथील आमने मालवा ते जरंडेश्वर नाक्यावरील रमाई स्मारक अशी कँडल रॅली काढण्यात आली. या रॅलीत मोठ्या संख्येने आंबेडकर अनुयायी सहभागी झाले होते. तसेच समिती व विविध आंबेडकरवादी संघटनांच्यावतीने सातारा नगरपालिकेसमोर रक्तदान शिबीर घेण्यात आले. तर अभिवादनासाठी येणाऱ्या अनुयायांना व नागरिकांना सरबत वाटप करण्यात आले.

error: Content is protected !!