सातारा,(भूमिशिल्प वृत्तसेवा): दि गुजराथी अर्बन को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीच्या शताब्दी सोहळ्याचा शुभारंभ शनिवार, दि. २६ रोजी सायंकाळी ६ वाजता शाहू कलामंदिर येथे सर्वाधिक खपाच्या ‘गोष्ट पैशापाण्याची’ या पुस्तकाचे लेखक आणि यशस्वी उद्योजक प्रफुल्ल वानखेडे यांच्या हस्ते होणार आहे, अशी माहिती संस्थेचे चेअरमन विनोद कुलकर्णी यांनी दिली.
याबाबत अधिक माहिती देताना विनोद कुलकर्णी म्हणाले, अतिशय कठीण परिस्थितीत २००५ साली संस्थेचे नेतृत्व माझ्याकडे आले. त्यानंतर अतिशय वेगाने संस्थेत बदल घडवले आणि संस्थेची चौफेर प्रगती केली. त्यावेळी संस्थेचे वसुल भागभांडवल फक्त २३ लाख ४४ हजार रुपये होते. आज ते १ कोटी १ लाख ७१ हजार रुपये आहे. संस्थेकडे ५ कोटी ३८ लाख रुपयांच्या ठेवी होत्या. आज संस्थेकडे २६ कोटी १६ लाख रुपयांच्या ठेवी आहेत. कर्जे ४ कोटी १३ लाख रुपयांची होती. आज कर्जे १८ कोटी ५३ लाख रुपयांची आहेत. संस्थेची गुंतवणूक फक्त १ कोटी ४९ लाख रुपयांची होती. आज संस्थेची गुंतवणूक १० कोटी ५८ लाख रुपयांची आहे. संस्थेच्या तीन स्वमालकीच्या इमारती आहेत. संपूर्ण कामकाज संगणकीकृत असून कोअर बॅकींग प्रणाली संस्थेने स्वीकारलेली आहे. शताब्दीनिमित्त खास ठेव योजनाही संस्थेने जाहीर केलेल्या आहेत. ५५५ दिवसांसाठी ८.५० टक्के व्याजदराची आणि तेवढ्याच कालावधीसाठी ज्येष्ठ नागरिकांसाठी ९ टक्के व्याजदराची योजना जाहीर करण्यात आली आहे. त्याशिवाय १ हजार दिवसांसाठी ९ टक्के आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी ९.५० टक्के व्याजदराची योजनाही जाहीर केली आहे. संस्थेच्या शताब्दी ठेव योजनांचा फायदा सातारकरांनी घ्यावा.
सामाजिक अर्थसाक्षरता वाढावी आणि सातारकर अर्थसक्षम व्हावेत यासाठी शताब्दी सोहळ्यानिमित्त प्रफुल्ल वानखेडे यांची प्रकट मुलाखत ठेवण्यात आली आहे. वानखेडे हे मुळचे सातारकर आहेत. गेल्या दोन दशकांपासून औष्णिक ऊर्जा, विविध इंधनांचे सुरक्षित ज्वलन, ऊर्जा संवर्धन या क्षेत्रात काम करत आहेत. ते पाच कंपन्यांचे संस्थापक-अध्यक्ष आहेत. त्यांच्या कंपन्या १८ देशात व्यवसाय करतात. महत्त्वाचे म्हणजे ते सातारकर आहेत. एक लाख खप झालेल्या पुस्तकाचे ते लेखक आहेत. नवीन पिढी घडवण्यासाठी, उद्योग आणि कौशल्ये विकसित करण्यासाठी आणि व्यवसायात यशस्वी होण्यासाठी अनुभवावर आधारित ते मार्गदर्शन करतात. सतत परदेशात त्यांचे काम सुरु असते. खास सातारकरांना मार्गदर्शन करण्यासाठी त्यांनी हा कार्यक्रम स्वीकारलेला आहे.
यावेळी सहाय्यक निबंधक शंकर पाटील, जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष हरिष पाटणे, नगरवाचनालय विश्वस्त समितीचे अध्यक्ष विजय पंडित उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमास उपस्थित रहावे, असे आवाहन व्हाईस चेअरमन ॲड. चंद्रकांत बेबले आणि संचालक मंडळाने केले आहे.
You must be logged in to post a comment.