सातारा, (भूमीशिल्प वृत्तसेवा) : एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाचे नेतृत्व करणाऱ्या आणि सध्या न्यायालयीन कोठडीत असणाऱ्या अॅड. गुणरत्न सदावर्तें यांना सातारा पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या ‘सिल्व्हर ओक’ या निवासस्थानी एसटी कर्मचाऱ्यांनी केलेल्या हल्ल्याप्रकरणी सदावर्ते यांना मुंबई पोलिसांनी अटक केली होती. दुसरीकडे सातारा पोलीसही गुणरत्न सदावर्ते यांना ताब्यात घेण्यासाठी ११ एप्रिलला मुंबईत पोहोचले होते. सदावर्ते यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आल्यानंतर आज सातारा पोलिसांनी सदावर्ते यांचा ताबा घेतला आहे.
उदयनराजे भोसले आणि संभाजीराजे छत्रपती यांच्या संदर्भात आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी सदावर्ते यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. ऑक्टोबर २०२० मध्ये दाखल गुन्ह्याच्या चौकशीसाठी सदावर्ते यांना बोलावण्यात आले होते. मात्र ते गैरहजर राहिल्याने सातारा शहर पोलिसांनी सदावर्ते यांना मुंबई पोलिसांकडून अटक होताच त्यांचा ताबा मिळवण्यासाठी पावलं उचलली होती. सातारा पोलिसांनी सदावर्ते यांचा मिळण्यासाठी गिरगाव न्यायालयात अर्ज केला होता. अखेर पोलिसांची विनंती मान्य करत न्यायालयाने सदावर्ते यांचा ताबा सातारा पोलिसांकडे देण्याचे निर्देश ऑर्थर रोड जेल प्रशासनाला दिले आणि आज सदावर्ते यांचा ताबा सातारा पोलिसांकडे देण्यात आला आहे.