सातारा, भूमिशिल्प वृत्तसेवा): राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त सातारा इन्स्टिटयूट ऑफ हॅम या संस्थेने प्रसारभारती आकाशवाणी केंद्र सातारा यांच्या मदतीने अजिंक्यतारा किल्यावर हिल टॉपिंग आणि फिल्ड डे (Hill Topping & Field Day) कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी वेगवेगळ्या प्रकारचे अँटेना उभारून हॅम रेडिओच्या मार्फत देशामध्ये आणि परदेशामध्ये संपर्क साधण्यात आला.
प्रतापगडापासून फुटणार्या बामणोली रांगेवर अजिंक्यतारा उभारलेला आहे. अजिंक्यतार्याची उंची साधारणत: ४४०० फूट असून त्याचा दक्षिणोत्तर विस्तार ६०० मीटर आहे. आज या किल्ल्यावर वृक्षारोपणासारखे अनेक सामाजिक उपक्रम राबवले जातात. सातार्यातून ज्या मार्गाने आपण गडावर प्रवेश करतो त्यामार्गावर दोन दरवाजे आहेत. दरवाजातून आत प्रवेश केल्यावर प्रसारभारती केंद्राचे कार्यालय व प्रसारभारती केंद्राचे टॉवर आहेत.
पूर्वीच्या काळी संपर्क यंत्रणा अस्तित्वात नसे त्यावेळी ढोल किंवा नागरे वाजवून, झेंडे हलवून, मशाली पेटवून किंवा धूर करून एका ठिकाण वरून दुसऱ्या ठिकाणा पर्यंत संदेशाची देवाण घेवाण केली जात असे. आता संदेशवहनाची अत्याधुनिक साधने उपलब्ध आहेत आपत्कालीन परिस्थितींमध्ये संदेश वाहनांची इतर साधने जेव्हा निरुपयोगी ठरतात तेव्हा हॅम रेडिओ चा उपयोग होतो.
आपत्कालीन परिस्थितींमध्ये हॅम रेडिओ च्या माध्यमातून कशाप्रकारे संपर्क यंत्रणा उभी केली जाऊ शकते याचे प्रात्यक्षित सातारा इन्स्टिटयूट ऑफ हॅम च्या अधिकाऱ्यांनी दाखवले. याप्रसंगी हॅम रेडिओ ऑपरेटर कोमल भोसले, निरंजन सुपेकर, शंतनू कारंडे, नौशाद मुलाणी तसेच प्रसार भारती आकाशवाणी केंद्र साताराचे मिलिंद जैन, चावरे , मनोज वाळिंबे उपस्थित होते.
सदर कार्यक्रमास प्रसारभारती सातारा आकाशवाणी केंद्राचे सहायक निदेशक अभियांत्रिकी व केंद्रप्रमुख संध्या रत्नपारखी आणि कराड अर्बन बॅंकचे संगणक अभियंता रोहित भोसले यांचे विशेष मार्गदर्शन लाभले.
You must be logged in to post a comment.