पाच जिल्ह्यात हनीट्रॅपचे जाळे निर्माण करणारी टोळी अटकेत

सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) : अश्लील व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देऊन प्रतिष्ठीत लोकांना हनीट्रॅपच्या जाळ्यात ओढणाऱ्या टोळीचा सातारा तालुका पोलीस ठाण्यातील गुन्हे प्रकटीकरण शाखेने पर्दाफाश केला.यामध्ये एका महिलेचा समावेश असून, या टोळीने सातारा, पुणे, बारामती, सांगली, कोल्हापूर जिल्ह्यातील प्रतिष्ठीत लोकांना लुटले असल्याचे तपासात समोर येत आहे.

काजल प्रदीप मुळेकर (वय २८, रा. चव्हाणवस्ती थेऊर, ता. हवेली, जि. पुणे),अजिंक्य रावसाहेब नाळे (वय २३), वैभव प्रकाश नाळे (वय २८, दोघेही रा. करावागज ता. बारामती, जि. पुणे) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. या तिघांनाही न्यायालयात हजर केले असता त्यांना न्यायालयाने चार दिवस पोलीस कोठडी ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, सातारा जिल्ह्यातील एका बड्या व्यावसायिकाला एक वर्षापूर्वी हनीट्रॅपचे जाळ्यात ओढून लुटण्यात आले होते. संबंधित व्यवसायिकाला एका महिलेने मोबाइलवर अश्लील मेसेज पाठवून जाळ्यात ओढले.व्यवसायिकाला भेटण्यासाठी ही महिला सातारा बसस्थानकात आली. त्यानंतर व्यवसायिकाच्या कारने दोघे ठोसेघर येथे गेले. तेथील एका हॉटेलमध्ये हे दोघे बसले असताना तेथे या महिलेचे भाऊ म्हणून तीन ते चारजण आले. त्यांनी व्यवसायिकाला मारहाण करत त्याच्या गाडीतून साताऱ्यात आणले. तुझे अश्लील व्हिडीओ आमच्याकडे असून, हे प्रकरण मिटविण्यासाठी पैसे द्यावे लागतील, असे सांगितले. संबंधित व्यवसायिकाने भीतीपोटी व इज्जत जाऊ नये म्हणून त्या टोळीला सहा लाख रुपयांची रोकड, सोने, चांदी तर दिलीच पण स्वत:ची आलीशान कारही त्यांना दिली होती. फलटण येथे ही कार बेवारस आढळून आल्यानंतर पोलीस संबंधित व्यवसायिकापर्यंत पोहोचले. त्यानंतरच मग संबंधित व्यवसायिकाकडून हनीट्रॅपचे प्रकरण समोर आले. सातारा तालुका पोलिसांनी त्या व्यावसायिकाची तक्रार नोंदवून घेऊन तपास सुरू केला होता.

पोलिसांना तब्बल एक वर्षानंतर या टोळीच्या सूत्रधारापर्यंत पोहोचण्यास यश आले.पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल, अप्पर पोलीस अधीक्षक धीरज पाटील, सहायक पोलीस अधीक्षक आँचल दलाल यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सजन हंकारे, पोलीस उपनिरीक्षक अमीत पाटील, हवालदार दादा परिहार, सुजीत भोसले, सागर निकम, सतीश पवार, नितीराज थोरात, राजेंद्र वंजारी आदींनी या कारवाईत सहभाग घेतला

error: Content is protected !!