सातारा,(भूमिशिल्प वृत्तसेवा): वृत्तपत्र क्षेत्रात अत्यंत प्रतिष्ठेच्या मानल्या जाणाऱ्या महाराष्ट्र शासनाच्या अधिस्वीकृती (ॲक्रीडेशन) समितीच्या पुणे विभागाच्या अध्यक्षपदी दै. ‘पुढारी’ साताराचे वृत्तसंपादक, मराठी पत्रकार परिषदेचे सातारा जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष हरीष पाटणे यांची बिनविरोध निवड झाली. सातारच्या पत्रकारितेत आतापर्यंत कोणीही अशी किमया साधली नव्हती ती त्यांना प्रथमच साधता आली. गेल्या महिन्यात अधिस्वीकृती पदी त्यांची निवड झाल्यानंतर अध्यक्षपदाची निवडणूक लागल्यानंतर बिनविरोध बाजी मारत हरीश पाटणे यांनी इतिहास घडवला. त्यांच्या या निवडीबद्दल जिल्ह्यासह राज्यातून अभिनंदन होत आहे.
महाराष्ट्र शासनाने गेल्या दीड महिन्यापूर्वी राज्यस्तरीय व विभागीय अधिस्वीकृती समितीची रचना करुन नियुक्ती आदेश काढले. या समितीवर पुणे विभागातून गेली 24 वर्षे पत्रकारितेत कार्यरत असलेले दै. पुढारी’ सातारा आवृत्तीचे वृत्तसंपादक व सातारा जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष हरीष वसंतराव पाटणे, दै.ग्रामोध्दारचे चंद्रसेन बापूसाहेब जाधव, अमन सय्यद (पुणे), गोरख तावरे (कराड), सुनित भावे (पुणे) या पाच जणांची नियुक्ती करण्यात आली होती.
सातारा जिल्ह्यातून तिघांची निवड झाल्याने विशेष महत्त्व प्राप्त झाले होते.हरीष पाटणे गेली २४ वर्षे सातारच्या पत्रकारितेत कार्यरत असून सातारा जिल्ह्यासह पश्चिम महाराष्ट्रातील पत्रकारांच्या समस्यांबाबत त्यांनी सातत्याने आवाज उठवला आहे.आक्रमक पत्रकारितेद्वारे समाजातील समस्यांना वाचा फोडण्याचे काम ते प्रदीर्घ काळापासून करत आहेत. मराठी पत्रकार परिषदेशी संलग्न असलेल्या सातारा जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष म्हणून त्यांनी पत्रकारांच्या हितासाठी अनेक कामे केली. कोरोनाच्या कालावधीत जिल्ह्यातील पत्रकारांसाठी जीवनाश्यक वस्तूंचा पुरवठा तसेच दिवंगत पत्रकारांच्या कुटुंबांना संघटनेच्या माध्यमातून मदतीचा हात दिला आहे. त्यामुळे मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस. एम. देशमुख व किरण नाईक यांनी परिषदेच्यावतीने पुणे विभागीय समितीवर पाटणे यांची शिफारस केली. त्याला महाराष्ट्र शासनाने मान्यता दिली.अधिस्वीकृती सदस्य पदांच्या निवडी झाल्यानंतर आज शुक्रवारी दिनांक १ सप्टेंबर रोजी पुणे अधिस्वीकृती अध्यक्षपदाच्या निवडीचा कार्यक्रम जाहीर झाला. पाचही सदस्य यावेळी उपस्थित होते. निवडणूक प्रक्रियेची माहिती दिल्यानंतर उपस्थित इतर सदस्यांनी हरीश पाटणे यांच्या नावावर एकमत दर्शवले आणि त्यांची निवड झाली.
हरीष पाटणे यांच्या नियुक्तीबद्दल मुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री ना. अजितदादा पवार, उपमुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस, दै. ‘पुढारी’चे मुख्य संपादक डॉ. प्रतापसिंह जाधव, दै. ‘पुढारी’चे चेअरमन योगेश जाधव, मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस.एम. देशमुख, विश्वस्त किरण नाईक, टीव्ही जर्नालिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष विनोद जगदाळे, परिषदेच्या उपाध्यक्षा जान्हवी पाटील, दै. पुढारी’चे साताराचे विभागीय व्यवस्थापक जीवनधर चव्हाण, ग्रामोद्धारचे संपादक बापूसाहेब जाधव, मराठी पत्रकार परिषदेचे अध्यक्ष अध्यक्ष शरद पाबळे, पुणे विभागीय माहिती उपसंचालक राजू पाटोदकर, परिषदेचे राज्य उपाध्यक्ष शरद काटकर, सातारा पत्रकार संघाचे अध्यक्ष विनोद कुलकर्णी, जिल्हा पत्रकार संघाचे सरचिटणीस दिपक प्रभावळकर, परिषदेचे प्रतिनिधी सुजीत आंबेकर, प्रसिध्दीप्रमुख दिपक शिंदे, डिजीटल मिडिया परिषदेचे जिल्हाध्यक्ष सनी शिंदे तसेच मराठी पत्रकार परिषदेची राज्य कार्यकारिणी व मराठी परिषदेची जिल्हा कार्यकारिणी, सातारा जिल्हा इलेक्ट्रॉनिक मीडिया असोसिएशन, डिजीटल मीडिया परिषद व जिल्ह्यातील पत्रकारांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.
You must be logged in to post a comment.