जातीय वादातून हत्या करणाऱ्यांना कठोर शिक्षा द्या

साताऱ्यातील सामाजिक संघटनांची शासनाकडे मागणी

सातारा (भूमिशिल्प वृत्तसेवा) : पुरोगामी राज्य म्हणून ख्याती असलेल्या आपल्या महाराष्ट्रात काही महिन्यांपासून अनुसूचित जाती जमाती प्रवर्गातील लोकांवर जातीय वादातून हल्ले आणि हत्या होण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. या घटनांमधील गुन्हेगारांना कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी साताऱ्यातील विविध सामाजिक संघटनांनी राज्य सरकारकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.

या निवेदनात म्हटल्यानुसार, नागपूरमधील नरखेड (ता. पिंपळधारा) गावातील बौद्ध तरुण अरविंद बनसोड यांचा २७ मे २०२० रोजी संशयास्पद मृत्यू झाला. या प्रकरणाचा तपास सीआयडीकडे सोपविण्यात यावा व आरोपीविरुद्ध जातीवाचक शिविगाळ, अनुसूचित जाती जमाती अन्याय अत्याचार प्रतिबंध कायद्यान्वये कलमे व हत्याप्रकरणी ३०२ हे कलम लावून अटकपूर्व जामीन नामंजूर करत अरविंद बनसोड यांना न्याय देण्यात यावा.पिंपरी-चिंचवड शहरातील पिंपळे सौदागर येथील विराज जगताप या २० वर्षीय तरुणाचीही निर्घृणपणे हत्या करण्यात आली.
या घटनांचे गांभीर्य लक्षात घेऊन शासनाने मृत तरुणांच्या कुटुंबास पोलीस संरक्षण द्यावे. तसेच त्यांच्या कुटुंबीयांना तात्काळ आर्थिक मदत देण्यात यावी. वरील दोन्ही प्रकरणांत आरोपींना मृत्युदंडाची शिक्षा होण्याकरिता विशेष सरकारी वकिलांची नियुक्ती करून हा खटला जलदगती न्यायालयात चालवण्यात यावा, असेही या पत्रकात म्हटले आहे.पोलीस आयुक्त,नागपूर,पोलीस आयुक्त, पुणे आणि जिल्हाधिकारी, सातारा यांनाही या निवेदनाची प्रत देण्यात आली आहे. शिवांतिका सामाजिक संस्थेचे अध्यक्ष गणेश दुबळे, क्रांती थिएटरचे अध्यक्ष तसेच माजी नगरसेवक अमर गायकवाड, संभाजी ब्रिगेड, सातारा जिल्हाध्यक्ष गणेश चोरगे, वीर लहुजी वस्ताद साळवे सामाजिक संस्थेचे अध्यक्ष किशोर गालफाडे, वीर भगत सिंग विचार मंच तथा साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे जयंती समारोह समिती, सातारा शहराध्यक्ष कॉम्रेड उमेश खंडूझोडे आणि हिंदू-मुस्लिम भाईचारा समितीचे अध्यक्ष आदिल शेख यांनी या निवेदनाद्वारे वरील मागणी केली आहे.














error: Content is protected !!