महाबळेश्वर तालुक्यात सर्वाधिक पाऊस ; अनेक घरांचे छप्पर उडाले

सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) : सातारा जिल्ह्याला तौक्ते चक्रीवादळाचा फटका बसला असून अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली असून राहत्या घरांवरील छप्पर उडाले आहे. विजेचे खांब, वीज तार तुटल्याने वीज वितरणचे मोठे नुकसान झाले आहे. जिल्ह्यात आज पहाटे आणि काल दिवसभरात सरासरी एकूण 22.53 मि.मी. पाऊस पडल्याची नोंद झाली आहे.    

 जिल्ह्यात सकाळी 8 वाजेपर्यंत झालेल्या पावसाची तालुकानिहाय   एकूण पावसाची आकडेवारी मि. मी. मध्ये पुढीलप्रमाणे आहे.  सातारा- 19.10 मि. मी., जावळी- 32.04 मि.मी. पाटण-35.08 मि.मी., कराड-32.92 मि.मी., कोरेगाव-6.11 मि.मी., खटाव-5.81 मि.मी., माण- 0.42 मि.मी., फलटण- 0.00 मि.मी., खंडाळा- 2.45 मि.मी., वाई – 18.14 मि.मी., महाबळेश्वर-94.7 याप्रमाणे आतापर्यंत एकूण 22.53 मि.मी.  सरासरी पावसाची  नोंद झाली आहे.


महाबळेश्वर तालुक्यात ८८.८ मिलिमीटर तर पाचगणी येथे ५५.८  मी. तापोळा ११०.९ तर लामज येथे १२८ .३ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. रविवारी दुपारपासून पाऊस  व वाऱ्याने जबरदस्त जोर पकडल्याने महाबळेश्वर तालुक्याच्या पूर्व भागात अनेक ठिकाणी नुकसान झाले आहे. यामध्ये राजपुरी येथे तीन घरांचे नुकसान झाले तर आंबरळ दोन घरांचे तर पांगरी येथे ग्रीन हाऊसचा कागद वाऱ्याने फाटला आहे. नंदनवन सोसायटीमध्ये झाडे पडली आहेत.

पाचगणी येथे वाऱ्याच्या प्रभावाने अनेक झाडे वाऱ्याने उन्मळून पडली आहेत. विजेच्या तारा अनेक ठिकाणी तुटल्या  तर डीपीवर झाड पडल्याने डीपीचे नुकसान झाले आहे.  त्यामुळे शहरातील विद्युत प्रवाह खंडित झाला होता. २४ तासांच्या प्रतीक्षेनंतर काही अंशी  पुरवठा पूर्ववत झाला आहे. 
तर तालुक्याच्या पश्चिम पट्यात चिखली येथील अंगणवाडी शाळेचा पत्रा उडून गेला आहे. त्यामुळे शाळेचे नुकसान झाले आहे.  तर मांघर येथे जेचा खांब कोसळला आहे.आज दुपार नंतर काही प्रमाणात वारा कमी झाला असून पावसाने उसंत घेतली आहे..

error: Content is protected !!