अतिवृष्टीमुळे तुटलेले पुल व रस्त्यांची कामे व्हावीत ; खासदार पाटलांची गडकरींकडे मागणी

सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) : सातारा जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टी व पुरामुळे शेतीपिकांसह, रस्ते, पूल व नाल्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. गेले दोन दिवस महाबळेश्वर, वाई, सातारा, जावली, पाटण व कराड तालुक्यातील नुकसानग्रस्त भागाचा खासदार श्रीनिवास पाटील यांनी दौरा करुन माहिती घेतली होती. त्याबाबत आज दिल्ली येथे केंद्रीय रस्ते विकासमंत्री नितीन गडकरी तात्काळ भेट घेतली. भेटीदरम्यान नैसर्गिक संकटामुळे जिल्ह्यात उद्भवलेल्या परिस्थितीची सविस्तर माहिती त्यांना दिली.

अतिवृष्टीमुळे सातारा जिल्ह्यातील रस्ते व पूल तुटल्याने नागरिकांचे हाल होत असून त्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे रस्ते व पूलांची कामे तातडीने होणे आवश्यक असल्याचे सांगितले. अनेक पूल हे जुन्या पद्धतीचे, कमी उंचीचे असल्याने अतिवृष्टीच्या परिस्थितीत धोकादायक बनतात. या मार्गावरील दळणवळण ठप्प झाल्याने पावसाळ्यात नागरिकांचा सतत संपर्क तुटत असतो. त्यामुळे अनेक ठिकाणी पुलांची पुनर्बांधणी व काही ठिकाणी नवे पूल होणे गरजेचे आहे. त्यातील काही पूल हे तातडीने केंद्रीय रस्ते निधी (CRIF) मधून करावे अशी मागणी केली. त्यामुळे विस्कळीत झालेली दळणवळण सुविधा पुन्हा प्रस्थापित होतील व भविष्यात अशा अतिवृष्टीत सुद्धा वाहतूक व्यवस्था कोलमडणार नाही. दरम्यान महत्वपूर्ण कामांबाबत जिल्हा प्रशासन व बांधकाम विभागाशी चर्चा केली होती. त्या आधारे सदरची कामे प्रस्तावित केली. यावेळी सारंग पाटील हे देखील उपस्थित होते.

error: Content is protected !!