म्हसवड,(भूमिशिल्प वृत्तसेवा): कमी खर्चात, कमी श्रमात जास्त उत्पादन काढणे ही काळाची गरज आहे. शेतीतील उत्पादन वाढविण्यासाठी रासायनिक औषधांच्या वापरामुळे आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. निरोगी व सदृढ भारतासाठी शेतकऱ्यांनी विषमुक्त शेती करणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन जिल्हा बँकेचे अध्यक्ष नितीनकाका पाटील यांनी केले.
देवापूर, ता. माण येथील प्रयोगशील शेतकरी उद्धव बाबर यांच्या सेंद्रिय शेतीला दिलेल्या भेटीप्रसंगी ते बोलत होते. यावेळी जिल्हा बँकेचे संचालक राजेंद्र राजपुरे, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष प्रदीप विधाते, सरपंच शहाजी बाबर, रावसाहेब बाबर, अरुण माने, शिवाजी माने, कृष्णराव बाबर, सुरेश बाबर, विकास गायकवाड, दिलीप बाबर, विशाल जाधव उपस्थित होते.
नितीनकाका पाटील म्हणाले, नैसर्गिक शेतीसाठी जिल्हा बँकेने ठोस धोरण राबवले आहे. सध्या बदलत्या वातावरणाचा विचार केला तर नैसर्गिक शेती काळाची गरज बनली आहे. त्यामुळे जिल्हा बँकेनेच आता ग्लोबल वॉर्मिग ग्लोबल मॉर्निंग ही संकल्पना ना. रामराजे नाईक निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली राबवली असून भविष्यात विषमुक्त शेती विषमुक्त शेती काळाची गरज बनली आहे. हा प्रयोग प्रत्येकाने करावा. पाचट न जाळता जमिनीचा कर्ब वाढवणे, शेतीमध्ये कडधान्याची स्लरी व मूत्र जीवामृत गुळाचे पाणी याचीही नितांत आवश्यकता आहे. वाढलेले आजार हे आहारातून होत आहेत म्हणून आता पुन्हा सेंद्रीय उत्पादन अर्थात विषमुक्त शेतीकडेच वळले पाहिजे.
उद्धव बाबर यांनी नितीनकाका व सहकाऱ्यांना सेंद्रिय शेती दाखवून त्याबाबतची माहिती दिली. ते म्हणाले, ‘शेतकरी हा जगाचा पोशिंदा असला तरी शेतीसाठी खर्च कमी केलाच पाहिजे. जास्त उत्पादन मिळावे, या आशेने रासायनिक खतांचा वापर जास्त प्रमाणात होत आहेत. हे शेतीसाठी व मानवाच्या आरोग्यासाठी धोकादायक आहे. म्हणून सर्वांनी सेंद्रिय शेतीस प्राधान्य द्यावे. शेतकऱ्यांनी प्रथम माती व पाणी परिक्षण करुन घ्यावे. शेतीत नवनवीन जैविक खते व तंत्रज्ञानाचा वापर केल्यास शेती हा यशस्वी व्यवसाय होईल. यापुढे प्रत्येक शेतकरी व नागरिकाने विषमुक्त शेतीसाठी प्रचार व प्रसाराबरोबर प्रत्यक्ष अनुकरण करावे.यावेळी शेतकरी व ग्रामस्थ उपस्थित होते.
You must be logged in to post a comment.