साताऱ्यात विद्यार्थ्यांच्या दोन गटात जोरदार हाणामारी; एक जखमी

सातारा,(भूमिशिल्प वृत्तसेवा): साताऱ्यातील गजबजलेल्या परिसरातील एका नामांकित शाळेच्या मुख्य रस्‍त्‍यालगत सोमवारी सायंकाळी विद्यार्थ्यांच्या दोन गटात जोरदार राडा होऊन मारामारी झाली. शाळेतील ३० ते ४० मुलं एकमेकांना समोरासमोर भिडली. दगडाने मारहाण झाल्‍याने एकाचे डोकं फुटले. या घटनेनंतर परिसरात तणाव निर्माण होवून वाहतुक काहीकाळ ठप्‍प झाली.दरम्यान, या परीसरात वारंवार अशा प्रकारच्या घटना घडत असून एखादी गंभीर घटना होण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यासाठी विद्यालय आणि पोलीस प्रशासनाने वेळीच लक्ष घालून याबाबत ठोस कारवाई करावी अशी मागणी होत आहे.

याबाबत अधिक माहिती अशी, सोमवारी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास शाळा सुटल्यानंतर गर्दीने गजबजलेल्या परिसरात ही घटना घडली. शाळेतील काही विद्यार्थ्यांनी विद्यालयालगतच्या एका हॉटेलसमोर जुन्या भांडणाच्या कारणावरून हुल्‍लडबाजी सुरू केली. यानंतर अचानक विद्यार्थ्यांच्या दोन गटात मारहाणीसही सुरुवात झाली. यामुळे बघ्यांची व मुलांची अधिक गर्दी वाढली व त्‍यातच एकमेकांना दगड मारण्यात आल्‍याने या भांडणात एका विद्यार्थ्याचे डोके फुटले व रक्तबंबाळ अवस्थेत त्याला जिल्हा रुग्णालयात नेण्यात आले.

दरम्‍यान, अचानक घडलेल्‍या या घटनेने परिसरातील वाहतुक ठप्‍प झाली.सुमारे १५ मिनिटे मुख्य रस्‍त्‍यालगत ही भांडणे सुरु होती. नागरिकांनी मध्यस्‍थी करण्याचा प्रयत्‍न केला असता संशयित अल्पवयीन विद्यार्थी नागरिकांच्याही अंगावर गेले. या घटनेची माहिती पोलिसांना दिल्‍यानंतर त्‍यांनी घटनास्‍थळी धाव घेतली. पोलीस येत असल्‍याचे व जमाव वाढत असल्‍याचे पाहून संशयित युवकांनी तेथून पळ काढला. जखमी मुलाला जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. संबंधित जखमी मुलाच्या डोक्यात चार टाके पडले असल्याचे समजते.घटनेनंतर संबंधित विद्यार्थ्यांच्या पालकांना बोलावून घेऊन त्यांना मुख्याध्यापक,पोलीस तसेच अन्य शिक्षकांनी हा प्रकार व त्याच्या गांभीर्याची कल्पना दिली.

दरम्यान ,मारहाण करणारे सर्व विद्यार्थी इयत्ता दहावीतील असल्याचे समजत असून प्राथमिक माहिती घेतली असता मुलांची जुन्‍या भांडणाच्या कारणातून ही मारामारी झाली असल्याची माहिती समजली.रात्री उशीरापर्यंत याबाबत गुन्‍हा नोंद झालेला नव्हता.

error: Content is protected !!