कराडमध्ये अतिवृष्टी, पुणे-बंगळुरु महामार्गावर पाणीच पाणी, वाहतूकीचा वेग मंदावला

सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) : एकीकडे कोल्हापुरात पावसाने धुमाकूळ घातलेला असताना सातारा जिल्ह्यालाही पावसाचा फटका बसला आहे. बुधवारी संध्याकाळी सात वाजल्यापासून गुरुवारी सकाळी ८ वाजेपर्यंत जिल्ह्यातील अनेक महत्वाच्या ठिकाणी पावसाने दमदार हजेरी लावली. कराड तालुक्याला या पावसाचा जोरदार फटका बसला असून संपूर्ण तालुक्यात सरासरी ८८.७ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.

जिल्ह्यात काल दिवसभरापासून आज सकाळी 10 वाजेपर्यंत सरासरी एकूण 46.8 मि.मी.पाऊस पडला असून आतापर्यंत सरासरी 143.2 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात सकाळी 10 वाजेपर्यंत झालेल्या पावसाची तालुकानिहाय माहिती आणि कंसात आतापर्यंत झालेल्या एकूण पावसाची आकडेवारी मि. मी. मध्ये पुढीलप्रमाणे आहे. सातारा- 40 (146.6) मि. मी., जावळी- 80.1 (230.9) मि.मी., पाटण-82.3 (170.3) मि.मी., कराड-98.9 (203.7) मि.मी., कोरेगाव-20.4 (104.4) मि.मी., खटाव-15.1 (78.0) मि.मी., माण- 4.6 (57.2) मि.मी., फलटण- 2.8 (64.1) मि.मी., खंडाळा- 6.8 (77.5) मि.मी., वाई-18.7 (128.4) मि.मी., महाबळेश्वर-143 (389) मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. कोयना धरणाची धरणात आजअखेर 26.54 टीएमसी (26.51टक्के) एवढा पाणीसाठा झाला आहे. कोयना धरण क्षेत्रात झालेल्या पावसाची आणि कंसात आतापर्यंत झालेल्या एकूण पावसाची आकडेवारी 251 (443) मि.मी. आहे.

कराडमधील सुपनी, कोपर्डे हवेली मंडल या भागात तर पावसाने जवळपास शतक गाठलं. गुरुवारी सकाळी आठ वाजल्यानंतरही पावसाची संततधार कायम राहिल्यामुळे अनेक गावांमधली जनजीवन विस्कळीत झालेलं पहायला मिळालं. कराड, मलकापूर, सैदापूर, उंब्रज, शेणोली, उंडाळे, काले, सुपने या सर्व भागांमध्ये ८५ ते ९९ मि.मी. च्या घरात पावसाची नोंद झाली.

कोल्हापूर जिल्ह्यापाठोपाठ साताऱ्यालाही पावसाने झोडपलंय

या पावसाचं पाणी पुणे-बंगळुरु महामार्गावर आल्यामुळे काहीकाळासाठी वाहतूक विस्कळीत झाली होती. दरम्यान पावसाचा जोर असाच कायम राहिल्यास निर्माण होऊ शकणाऱ्या धोकादायक परिस्थितीचा आढावा घेत जिल्हा प्रशासनाने सर्व यंत्रणांना सतर्क राहण्याचे आदेश दिले आहेत.

error: Content is protected !!