मोदींच्या नेतृत्वाखाली देशात उच्चांकी प्रगती : खासदार उदयनराजे

कराडातील सभेत जिल्ह्यात आयटी पार्क उभारण्याची घोषणा

कराड,(भूमिशिल्प वृत्तसेवा): पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्रातील स्थिर सरकारने सर्वच क्षेत्रांमध्ये प्रगती केलेली आहे. आता मोदी सरकार पुन्हा सत्तेवर येणार असून देशाची उच्चांकी प्रगती होईल असा विश्वास महायुतीचे लोकसभा उमेदवार खासदार उदयनराजे भोसले यांनी व्यक्त केला.

लोकसभा निवडणुकीसाठी कराड येथे आयोजित केलेल्या जाहीर प्रचार सभेत ते बोलत होते. याप्रसंगी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, केंद्रीय मंत्री रामदास आठवले, खासदार उदयनराजे भोसले, पालकमंत्री शंभूराजे देसाई, आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले आमदार महेश शिंदे, माजी आमदार मदन भोसले, माजी आमदार नरेंद्र पाटील, भाजपचे जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम, भाजपचे लोकसभा प्रभारी अतुल भोसले, कराड उत्तर विधानसभा मतदारसंघाचे प्रचार प्रमुख मनोजदादा घोरपडे, मच्छिंद्र सकटे, भाजप किसान मोर्चाचे राज्य सरचिटणीस रामकृष्ण वेताळ, विक्रम पावसकर, विक्रांत पाटील, भाजपच्य महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष सुरभी भोसले, शिवसेना महिला आघाडीच्या जिल्हाप्रमुख शारदाताई जाधव, डॉ. प्रियाताई शिंदे, ज्ञानदेव रांजणे, भाजपचे जिल्हाध्यक्ष पुरुषोत्तम जाधव, शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष जयवंत शेलार कराडचे माजी उपनगराध्यक्ष राजेंद्र सिंह यादव रयत क्रांती संघटनेचे सचिन नलावडे, भाजपच्या प्रदेश उपाध्यक्ष चित्रलेखा माने कदम यांची प्रमुख उपस्थिती होती.

खासदार उदयनराजे म्हणाले, संपूर्ण पृथ्वीवर छत्रपती शिवाजी महाराज हे एकमेव राजे आहेत, ज्यांनी राज्यकारभारात लोकांचा सहभाग घेतला. त्यामुळे शिवाजी महाराज खऱ्या अर्थाने लोकशाहीचे जनक आहेत. समता लोककल्याणाचा विचार अनेकांनी भाषणापुरता मर्यादित ठेवला. परंतु शिवरायांना अभिप्रेत असलेला समतेचा विचार अस्तित्वात आणण्याचा संकल्प मोदींनी केला आणि तो सत्यात उतरवला आहे. काँग्रेसचे नेते निवडणुकीपुरत्या अनेक थापा मारतात. मात्र निवडणूक झाल्यानंतर ते मतदारांकडे पाठ फिरवतात. त्यामुळे महाविकास आघाडीची वाटचाल ही अधोगतीच्या मार्गाने सुरू आहे. काँग्रेसने दुष्काळाच्या नावानं मतांचा जोगवा मागितला पण सिंचन प्रकल्प रखडवले. अनेक गावांचा पिण्याचा प्रश्नही सोडवला नाही. अनेक वर्षांच्या सत्तेमुळे काँग्रेस नेत्यांना अहंकार चढला होता, काम केलं नाही तरी जनता आपल्या पाठीशी राहील, असे त्यांना वाटत होते परंतु जनतेने दहा वर्षांपूर्वी परिवर्तन घडवून त्यांना धडा शिकवला आहे.

दरम्यान, सातारा जिल्ह्याच्या विकासासाठी महत्त्वाचे असलेल्या पर्यटन विकास, औद्योगिक विकास यासाठी केंद्र सरकारच्या माध्यमातून प्रयत्न करणार असून जिल्ह्यात सुसज्ज आयटी पार्क उभारण्यासाठी निश्चितपणे उपाययोजना केली जाईल. सुशिक्षित तरुणांच्या हाताला काम देऊन त्यांची जन्मभूमी हीच कर्मभूमी ठरावी, यासाठी प्रयत्न करून त्यांचे इतर जिल्ह्यातील विस्थापन थांबवणार आहे, असेही उदयनराजे म्हणाले.

काँग्रेसचा हा तर ब्लेम गेम

छत्रपती शिवाजी महाराजांच्या समतेच्या विचारातून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी भारताचे संविधान लिहिले आहे. काँग्रेसचे नेते ब्लेम गेम खेळत भाजपवर संविधान बदलाचा आरोप करत आहेत. वास्तविक, पाहता काँग्रेसच्या तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी देशावर आणीबाणीला लादून संविधानाच्या खात्मा करण्याचा प्रयत्न केला होता, असे उदयनराजे म्हणाले.

कोण काय म्हणाले…,

नरेंद्र मोदी हे ओबीसी समाजाचे देशातील पहिले प्रधानमंत्री आहेत. याचे राहुल गांधींना वाईट वाटते आहे. देशातील जनतेला आर्थिक सामाजिक स्तरावर न्याय मिळवून देण्यासाठी नरेंद्र मोदी झटत आहेत.

  • रामदास आठवले, केंद्रीय मंत्री ………………………………………………………………
  • देशाच्या सुरक्षेतेसाठी सध्याची लोकसभा निवडणूक अत्यंत महत्त्वाची आहे. उदयनराजेंना मत म्हणजे मोदींना मत असे धोरण राबवणे गरजेचे आहे. भाजप सरकारच्या काळात असंख्य योजना राबवल्या गेल्या मात्र त्यात एक रुपयाचा भ्रष्टाचार नाही. काँग्रेसच्या काळात हे पाहायला मिळत होतं का?
  • आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले ..………………………………………………………………………
  • माथाडी गोरगरिबांना लुटणाऱ्यांना आपल्याला पराभूत करायचे आहे, शेतकरी संस्थेची निगडित हजारो कोटींचा अपहार करणाऱ्या फरार गुन्हेगाराला जनता निवडून देणार नाही. महायुतीच्या सरकारने जिल्ह्यातील इंच ना इंच भूमी सिंचनाखाली आणण्याचा निर्णय घेतला आहे.
  • आमदार महेश शिंदे …………………………………………………………………………
  • महायुतीच्या सरकारच्या काळामध्ये मातंग समाजाचे ३५ वर्षांपासून प्रलंबित असलेले प्रश्न सुटलेले आहेत. मोदींकडून संविधानाला कोणताही धोका नाही. उदयनराजेंचे कॉलर संसदेचे ताट ठेवण्यासाठी जनतेने त्यांना साथ द्यावी.
  • मच्छिंद्र सकटे

error: Content is protected !!