सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) : कोरोनामुळे पर्यायाने काही महिने विद्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचित रहावं लागलं. पण अशा संकटाच्या काळात हिंदवी पब्लिक स्कूलने विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षण सुरू ठेवून शिक्षणाच्या प्रवाहात ठेवण्यासाठी जे प्रयत्न केले ते कौतुकास्पद आहेत. तसेच विद्यार्थ्यांना संकट काळात कसा संघर्ष करायचा याचीही शिकवण दिली,यामुळे विद्यार्थ्यांना पुढील शिक्षण घेताना अडचणी येणार नाहीत.अशा शिक्षणाच्या शिदोरीमुळे भविष्यात हिंदवी पब्लिक स्कुलचा विद्यार्थी साता-अटकेपार झेंडा रोवल्याशिवाय राहणार नाही असे गौरवोद्गार ज्येष्ठ करसल्लागार अरुण गोडबोले यांनी काढले.
श्रीनिधी एज्युकेशन सोसायटीच्या हिंदवी पब्लिक स्कूलच्यावतीने “हिंदवी ई स्कूल सक्सेस सागा” या पुस्तक प्रकाशन सोहळ्याचे ऑनलाईन आयोजन केले होते.यावेळी गोडबोले बोलत होते. याप्रसंगी श्रीनिधी एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष अमित कुलकर्णी, सचिव नानासाहेब कुलकर्णी, माध्यमिक विभागाच्या प्रमुख रामेश्वरी यादव, ज्योती काटकर उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते ई बुकचे ऑनलाईन प्रकाशन करण्यात आले.
गोडबोले म्हणाले, कोरोनामुळे प्रत्येक क्षेत्राचं मोठं नुकसान झाल ते कधीही न भरुन येणारं नाही. शिक्षणाकडे उद्याचं भविष्य म्हणून पाहिलं जातं मात्र, कोरोनाच्या या कठीण काळात जगणं मुश्कील होतं तिथं शिक्षणाची काय कथा होती. येणाऱ्या काळात ऑनलाईन शिक्षण हेच काय ते सत्य आहे आणि तेच समोर चालू राहणार आहे. त्यामुळे आता शाळेत कौशल्य विकास आणि नाविन्यपूर्ण विचारांवर भर दिला जावा. यामध्ये विद्यार्थी विज्ञानाधारित, उद्योजकता शिकतील.
अमित कुलकर्णी म्हणाले, कोरोनामुळे सर्वांचे आर्थिक नियोजन कोसळले होते. तरीही या काळात काळाची पाऊले ओळखून हिंदवीने विविध उपक्रम राबवले. लॉकडाऊन जाहीर केल्यानंतर लगेच आम्ही ऑनलाईनकडे वळालो. जवळपास सगळे वर्ग डिजिटल केले. आम्ही विद्यार्थ्यांना ऑनलाईन पद्धतीनं अभ्यासक्रम पुर्ण केला. पण, असं असलं तरी काही प्रमाणात हे काम आव्हानात्मक होते. शिक्षकांना विद्यार्थ्याशी वन-टू-वन संवाद साधायला इथं मर्यादा येत होत्या. मात्र, हळूहळू शिक्षकांनी तंत्र आत्मसात करुन मुलांच्या शिक्षणाच्या प्रवाहात ठेवले. त्यांच्या वेळोवेळी परिक्षा घेऊन त्यांची आकलन क्षमता तपासली. ज्या ठिकाणी विद्यार्थी कमी पडत होते. त्याठिकाणी त्यांची तयारी करुन घेतली. कोरोना अजूनही हद्दपार झालेला नाही. त्यामुळे पुढील शैक्षणिक वर्षाची सुरुवात ऑनलाईन पध्दतीने करावी लागणार आहे. त्यादृष्टीने स्कूल प्रशासनाने तयारी केली आहे.
या कार्यक्रमास विद्यार्थी, पालक मोठ्या संख्येने ऑनलाईन पध्दतीने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्तावित व सूत्रसंचलन मंजुषा बारटक्के यांनी केले. शिल्पा पाटील यांनी आभार मानले. तर कार्यक्रमाची तांत्रिक बाजू यास्मिन बागवान व ओमकार रामदासी यांनी सांभाळली.
You must be logged in to post a comment.