सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र लाॅकडाऊन करण्यात आले. या काळात शासन नियमांनुसार शाळा बंद ठेवण्यात आल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान झाले. मात्र, हिंदवी पब्लिक स्कूलने डिजिटल क्लास रुम आणि सोशल मिडियाचा प्रभावी वापर करून आॅनलाईन शिक्षणाद्वारे विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात ठेवले. त्यामुळे शाळा जरी बंद असल्या तरी हिंदवीच्या विद्यार्थ्यांचे शिक्षण थांबले नाही. ते अविरतपणे सुरूच आहे. यासाठी शाळा प्रशासन आणि शिक्षकांनी केलेले काम निश्चित कौतुकास्पद आहे, असे गौरवोद्गार खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी काढले.
श्रीनिधी एज्युकेशन सोसायटीच्या हिंदवी पब्लिक स्कूलला खासदार उदयनराजे भोसले यांनी सदिच्छा भेट दिली. यावेळी उदयनराजे यांनी सातारा नगरपालिकेच्यावतीने चालू असलेल्या शाहूपुरी करंजे तर्फमधील विविध कामांचा आढावा घेतला. यावेळी संस्थेचे अध्यक्ष व शिवाजी विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेचे सदस्य अमित कुलकर्णी, उपाध्यक्ष देवदत्त देसाई, सचिव नानासाहेब कुलकर्णी, श्रीनिधी युवक नागरी पतसंस्थेचे चेअरमन शैलेश ढवळीकर, सरिता पाडळे, गजानन पाडळे, पूनम काटकर, अरविंद काटकर उपस्थित होते.
अमित कुलकर्णी म्हणाले, कोरोनामुळे शिक्षण क्षेत्रात मोठ्या प्रमाणात बदल झाले असून नवनवीन तंत्रज्ञानामधील अभ्यासक्रमांची मागणी वाढू लागली आहे. हे अभ्यासक्रम आपल्या संस्थेत चालविण्यासाठी हिंदवी स्कूल सुसज्ज आहे. भविष्यातील या बदलास सामोरे जाण्यासाठी, तसेच पालक, विद्यार्थी व समाजाची मागणी पूर्ण करण्यासाठी हिंदवीची तयारी केली आहे.
खासदार उदयनराजे भोसले यांनी कोरोना काळात हिंदवी पब्लिक स्कूलने केलेल्या उपक्रमांची माहिती घेतली. तसेच डिजिटल क्लास रुम व सुरु असलेल्या कामांची पाहणी करून मार्गदर्शन केले. यावेळी संस्थेचे सचिव श्री नानासाहेब कुलकर्णी यांनी खासदार उदयनराजे भोसले यांचा सत्कार केला. सौ मंजुषा बारटक्के यांनी स्वागत व प्रास्ताविक केले.सौ.शिल्पा पाटील यांनी आभार प्रदर्शनाचे काम केले. यावेळी कार्यक्रमास परिसरातील नितीन धुमाळ, महेश औताडे, विनया कांबळे, ज्योती मोहिते, जयदीप मोहिते, अमोल देशमुख, मयुरी तरडे, संतोष गंधाले, तसेच सर्व नागरिक, शाळेतील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.
You must be logged in to post a comment.