सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) : आषाढी एकादशीनिमित्त लाखो वारकरी दरवर्षी विठुरायाच्या दर्शनासाठी पंढरपूरला रवाना होता. मात्र, दोन वर्षांपासून कोरोनाच्या सावटामुळे घऱी राहून विठ्ठलाचे दर्शन घेतले जाते. विठुराया अन् आषाढीचे महत्त्व शाळांमधील चिमुकल्यांनाही समजावे, या उद्देशाने हिंदवी पब्लिक स्कूलमध्ये आषाढी एकादशी साजरी करण्यात आली. वृक्षदिंडी, रिंगण असे अनेक उपक्रम यावेळी राबविण्यात आले. डिजिटल माध्यमांवर चिमुकल्यांनी विठुनामाचा जयघोष करीत त्यात उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.
हिंदवी शाळेच्या पटांगणात ज्ञानोबा-माऊलींच्या गजरात विलोभनीय दिंडी सोहळा साजरा करण्यात आला. दहावीचे प्रातिनिधी काही विद्यार्थी, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी या सोहळ्यात सहभागी झाले होते. सोहळ्याची सुरुवात संस्थेचे अध्यक्ष अमित कुलकर्णी यांनी पालखी पुजनाने केली. यावेळी वेगवेगळ्या अभंगांवर चिमुकल्या वारकऱ्यांनी ताल धरला होता. शाळेच्या शिक्षकवृंदाने फेर धरून, फुगड्या खेळून आनंद व्यक्त केला. या सोहळ्याचे सर्वांत मोठे आकर्षण म्हणजे ‘विठ्ठल’. शिक्षकेत्तर कर्मचारी गणेश मेलंगे यांनी विठ्ठलाची वेशभूषा केली होती. विद्यार्थी भगवा झेंडा हाती घेऊन यात सामील झाले होते, तर शिक्षिकांनी डोक्यावर तुळशी वृंदावन घेऊन सहभागी झाल्या होत्या. पावसाच्या रिमझिम सरींतला हा सोहळा पाहण्यासाठी विद्यार्थ्यांसह पालकवर्गही मोठ्या संख्येने आॅनलाईन उपस्थित होता. या सोहळ्याची पसायदानाने सांगता करण्यात आली.
यावेळी घऱी विठ्ठल-रखूमाई, वारकऱ्यांच्या वेशभूषेतील विद्यार्थ्यांनी हाती टाळ घेत चंद्रभागेच्या तिरी, पाऊले चालती, विठ्ठलनामाची शाळा भरली… यांसारखी गीते व भजने विद्यार्थ्यांनी सादर केली. हातातील टाळ-चिपळ्यांचा गजर, मुखी विठ्ठलनाम यामुळे वातावरणात चैतन्य निर्माण झाले होते.
You must be logged in to post a comment.