‘आरंभ है प्रचंड है’ च्या निनादात हिंदवी स्कूलमध्ये किलबिलाट सुरू

पुष्पवृष्टी, औक्षणासह हळदी – कुंकवाच्या पावलांनी चिमुकल्यांचा शाळेत उत्साहात प्रवेश

सातारा,(भूमिशिल्प वृत्तसेवा): नवा वर्ग – नवी इयत्ता- नवी पुस्तके अशा नवेपणाच्या नवलाईसह शाळेचा पहिला दिवस सुरू झाला आणि “आरंभ हे प्रचंड …”च्या निनादात शाहूपुरी येथील हिंदवी पब्लिक स्कूलमध्ये बालचमुंचा नव्या शैक्षणिक वर्षातील किलबिलाट सुरू झाला. शिक्षकांकडून विद्यार्थ्यांवर पुष्पवृष्टी करून औक्षण करण्यात आले. हळदी – कुंकवाच्या पावलांनी चिमुकल्यांनी उत्साहात शाळेत प्रवेश केला.

उन्हाळ्याची दीर्घ सुट्टी संपल्यानंतर हिंदवी पब्लिक स्कूलमध्ये नुकतीच नव्या शैक्षणिक वर्षातील पहिल्या दिवसाची शाळेची पहिली घंटा वाजली. शाळेचा पहिला दिवस अविस्मरणीय करण्यासाठी शाळेत प्रथम पाऊल ठेवणाऱ्या चिमुकल्यांचं शिक्षकांकडून औक्षण करत अनोख्या पध्दतीने स्वागत करण्यात आले. तसेच तबकामध्ये ओले हळद – कुंकू ठेवण्यात येऊन त्यात ठेवलेल्या पावलांनी शुभ संस्कारांची पदचिन्हे शाळेच्या जमिनीवर उमटवत लक्ष्मी- सरस्वती, दत्तप्रभूंच्या पावलांनी बालचमूंनी उत्साहात शाळेत प्रवेश केला.त्यानंतर विद्यार्थ्यांनी छत्रपती शिवाजी महाराज, राजमाता जिजाऊ आणि सरस्वतीच्या प्रतिमेला पुष्प अर्पण केले.

नवीन गणवेश, नवी कोरी पुस्तकं, जुन्या आणि नव्या मित्रांची भेट, चिमुकल्यांना पहिल्या दिवशी शाळेत सोडण्यासाठी आलेले पालक, अशा उत्सुकतेच्या वातावरणात शाळेचा परिसर गजबजला होता. यावेळी शाळांचा परिसर आणि वर्ग फुलांनी तसंच चित्रांनी सजवण्यात आले होते.

या पारंपरिक स्वागतामुळे मुलांना पवित्रता व निरागसतेचे स्वरूप कृतीतून दिसून आले. शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी कपाळावर टिळा लावून विद्यार्थ्यांचे शाळेच्या आवारात केलेल्या स्वागताने विद्यार्थी भारावून गेले होते. यावेळी प्रत्येक विद्यार्थ्याला युनिफॉर्मवर लावण्यासाठी ‘आरंभ हे प्रचंड’ ही अक्षरे लिहिलेले बॅचेस देण्यात आले.विद्यार्थ्यांनीही या टॅगलाईन प्रमाणे मोठ्या उत्साहात नव्या शैक्षणिक वर्षाचा अविस्मरणीय प्रारंभ केला.दिवसभर शाळेचा परिसर विद्यार्थ्यांच्या किलबिलाटाने गजबजून गेला होता.

या स्वागत समारंभासाठी संस्थेचे अध्यक्ष अमित कुलकर्णी, सचिव नानासाहेब कुलकर्णी, अश्‍विनी कुलकर्णी, रमणी कुलकर्णी, मुख्याध्यापिका मंजुषा बारटक्के, उपमुख्याध्यापिका शिल्पा पाटील, विनोद दाभाडे, गौरव माने यांच्यासह सर्व शिक्षक-शिक्षिका उपस्थित होते.

शिक्षणाबरोबरच संस्कृती जतन करण्याचा प्रयत्न..

आमच्या शाळेत ज्ञानार्जनाबरोबरच संस्कृती जतन करणे, संस्कार रुजवणे आणि माणूस म्हणून विद्यार्थी घडवणे सुरू असते. शाळेच्या पहिल्या दिवशी भविष्यातील उज्वल यशाचे प्रतीक म्हणून ‘आरंभ हे प्रचंड’च्या निनादात नवे शैक्षणिक वर्ष सुरू झाले. शाळेत पुन्हा किलबिल होऊ लागल्याने शाळेच्या परिसरात चैतन्य निर्माण झाले आहे. पालकांच्या अपेक्षा आणि विद्यार्थ्यांना गुणवत्तेच्या सर्वोच्च पातळीवर नेण्यासाठी आमच्या शाळेचे सर्वच घटक प्रयत्नशील असतात. नव्या शैक्षणिक वर्षात सर्व विद्यार्थ्यांचं स्वागत करताना अत्यानंद होत आहे.

श्री.अमित कुलकर्णी, अध्यक्ष,हिंदवी शिक्षण संस्था, सातारा.

error: Content is protected !!