घोटाळे करता अन् सहानुभूती कसली मागता 

खासदार उदयनराजे भोसले यांचा महाबळेश्वरातील कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात विरोधकांना सवाल

महाबळेश्वर,(भूमिशिल्प वृत्तसेवा): पश्चिम महाराष्ट्रात काही लोक दमदाटी करून प्रचार करायचे. त्यांना आम्ही आता जमिनीवर आणले आहे. भ्रष्टाचार लपवून सहानुभूती मिळवण्यासाठी ते जनतेसमोर जात आहेत. अरे घोटाळे करता मग सहानुभूती कसली मागता? असा सवाल महायुतीचे भाजपचे लोकसभा उमेदवार खासदार उदयनराजे भोसले यांनी उपस्थित केला.

महाबळेश्वर तालुक्यातील महायुतीतील घटक पक्षांच्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात ते बोलत होते. याप्रसंगी आमदार देवयानी फरांदे, भाजपचे प्रदेश कार्यकारणी सदस्य अविनाश फरांदे, माजी नगराध्यक्ष किसनशेठ शिंदे, माजी नगरसेवक कुमार शिंदे, विमल पार्टे, नारायण बिरामणे, रुपेश बगाडे, अमोल कांबळे, संदीप साळुंखे, प्रीतम कळसकर, आरती झुंजार, शेखर भिलारे, अनिल कांबळे, तानाजी भिलारे, विजय भिलारे, शरद बावळेकर, संभाजी भिलारे, शंकर बावळेकर, विजय नायडू, रवींद्र कुंभारदरे, संतोष आखाडे, यशवंत भिलारे, मुन्नाभाई, राजेंद्र बावळेकर, दिलावरशेठ बागवान, महेश रसाळ, तानाजी भिलारे, संभाजी भिलारे, विजय भिलारे, अशोक ढेबे यांची उपस्थिती होती.

खासदार उदयनराजे भोसले म्हणाले, काहीजण माझ्या कॉलर उडवण्याच्या स्टाईलबाबत टीका करतात पण लोकांचे काम करतो म्हणून मी कॉलर उडवतो आणि त्याची मला सवय आहे, याउलट माझ्यावर टीका करणाऱ्यांना भ्रष्टाचार करण्याची सवय आहे असा टोला उदयनराजे यांनी लगावला.पाचगणी, महाबळेश्वर या दोन शहराच्या विकासासोबतच स्थानिक जनतेला ज्या समस्या भेडसावत आहेत, त्या मार्गी लावण्यासाठी निश्चितपणाने भविष्यकाळात प्रयत्न सुरूच ठेवले जाणार आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा मला अभिमान वाटतो. त्यांनी ठाणेत राहून देखील आपल्या गावाची नाळ तुटू दिली नाही. महाबळेश्वर आणि पाचगणी या दोन्ही शहरांसह परिसराकडे त्यांचे विशेष लक्ष आहे.

आमदार देवयानी फरांदे म्हणाल्या, मनमोहन सिंग सरकारमध्ये शरद पवार हे कृषिमंत्री असताना शेतकऱ्यांसाठी सन्मान योजना सुरू करण्याचं त्यांना सुचलं नाही, ते मोदींच्या नेतृत्वाखालील भाजपने करून दाखवलं. लंडन येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे घर भाजपने स्मारक म्हणून जतन केले.  आताची लोकसभेची निवडणूक, हे राष्ट्र कुणाच्या हातात सुरक्षित ठेवायचं याच्यासाठी आहे. जाती धर्मात तेढ निर्माण करण्याचे षडयंत्र करणाऱ्यांना घरी बसवण्याची ही वेळ आहे.

सुनील काटकर म्हणाले, महाबळेश्वर- खंडाळा -वाई हे संपूर्ण मतदारसंघांचा दौरा आमदार मकरंद पाटील यांच्यासोबत केला जाणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील महाबळेश्वरात बैठक घेण्यात नियोजन केले आहे. मतदाना दिवशी जास्तीत जास्त मतदान होईल याकडे आमचे लक्ष आहे. महायुतीतील सर्व घटक पक्षाच्या कार्यकर्त्यांनी एकत्र नियोजन करून उदयनराजेंना विजयी करावे,असे आवाहन केले.

कुमार शिंदे म्हणाले, भाजप, शिवसेना, रिपाई, मनसे या पक्षांच्या सर्व कार्यकर्त्यांनी कमळ हे चिन्ह घरोघरी पोहोचवले आहे. लोकसभेची निवडणूक ही स्वतःची निवडणूक आहे, असा विश्वास ठेवून कार्यकर्त्यांनी कामाला लागावे.

error: Content is protected !!