सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) : देशातील एक आदर्श बँक असा नावलौकिक असलेल्या बँकेवर संचालकपदाच्या हव्यासापोटी तथ्यहीन आणि बिनबुडाचे आरोप केले जात आहेत. सवंग लोकप्रियतेसाठी बँकेवर आरोप करणाऱ्यांच्या फसवेगिरीला मतदार थारा देणार नाहीत. मी संघर्षातून वर आलो आहे. संघर्ष मला नवीन नाही. त्यामुळे कोणी काहीही करू द्या, कोणाला घाबरायचं काहीही कारण नाही. मी कायम तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे, असा शब्द जिल्हा बँकेचे चेअरमन आ. श्रीमंत छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी मतदारांना दिला.
सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीनिमित्त शेंद्रे येथील स्व. अभयसिंहराजे भोसले सांस्कृतिक भवन येथे आयोजित बँकेच्या सातारा तालुक्यातील मतदार मेळाव्यात आ. शिवेंद्रसिंहराजे बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष चंद्रकांत जाधव, माजी शिक्षण सभापती सतीश चव्हाण, माजी सदस्य राजू भोसले, विद्यमान सदस्य प्रतीक कदम, जिल्हा बँकेचे संचालक प्रकाश बडेकर, कांचन साळुंखे, अनिल देसाई व कार्यकर्ते उपस्थित होते.
आ. शिवेंद्रसिंहराजे म्हणाले, आपला स्वार्थ साध्य होत नसल्याचे दिसताच रेटून खोटं बोलायचं आणि चांगल्या संस्थेची बदनामी करायची, लोकांची आणि मतदारांची दिशाभूल करायची हा प्रकार सध्या जोमात सुरु आहे. त्याने काहीही साध्य होणार नाही उलट मतदार आणि जिल्हावासियांचे मनोरंजनच होत आहे. राज्य आणि देशपातळीवर नावाजलेल्या जिल्हा बँकेबाबत अपुऱ्या माहीच्या आधारे कोणी तथ्यहीन आरोप करत असेल तर त्या बँकेचा चेअरमन म्हणून त्या आरोपांचे खंडण करणे आणि वस्तुस्थिती जनतेसमोर मांडणे हे माझे कर्तव्यच आहे. बँकेचा इतिहास पाहता बँकेचे कामकाज राजकारणविरहित चालले आहे. ही निवडणूक सुद्धा पक्षविरहित होणार आहे. त्यामुळे जे बँकेच्या प्रगतीसाठी, शेतकऱ्यांच्या उन्नतीसाठी एकविचाराने काम करतात त्याच उमेदवारांना आणि त्यांच्या संपूर्ण पॅनेलला निवडून देणे ही आपली जबाबदारी आहे.
You must be logged in to post a comment.