सर्वसामान्यांच्या प्रश्नांसाठी मी रस्त्यावर उतरणारा कार्यकर्ता : आ.शशिकांत शिंदे

शेंद्रे,परळी जिल्हा परिषद गटातील गावभेटी दरम्यान जनतेशी संवाद

परळी,(भूमिशिल्प वृत्तसेवा):निवडून दिल्यानंतरही काही लोक पाच वर्षे गायब असतात आणि निवडणूक लागली की ते पुन्हा जनतेसमोर येतात.त्यामुळे अशी पावसाळ्यात उगवणारी भूछत्रे नागरिकांना चांगलीच माहिती झाली आहेत.जनतेच्या विकासासाठी “वाट्टेल ते” करणारा आणि अहोरात्र झटणारा, प्रसंगी रस्त्यावर उतरणारा मी कार्यकर्ता आहे. विकासाला प्राधान्य देऊन प्रत्येक विभाग पुढे नेणे हे माझे धोरण आहे, असे प्रतिपादन सातारा लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार आ. शशिकांत शिंदे यांनी केले.

सातारा तालुक्यातील प्रचारार्थ परळी व शेंद्रे विभागातील गाव भेटी दरम्यान आ.शशिकांत शिंदे यांनी लोकांशी संवाद साधला.यावेळी आ. शशिकांत शिंदे यांनी शेंद्रे जि.प. गटातील वळसे,शेंद्रे,भाटमरळी,कुसवडे, धनावडेवाडी, मापरवाडी, शेळकेवाडी, जकातवाडी व डबेवाडी तर परळी जि.प. गटातील अंबवडे, गोंदवडे सायळी, रोहोट, कुस बुद्रुक, परळी, गजवडी, ठोसेघर, कारी, पोगरवाडी या गावांमध्ये मतदारांच्या घरोघरी जाऊन भेटी घेतल्या.

यावेळी मतदारांशी संवाद साधताना आ. शशिकांत शिंदे म्हणाले, सर्व सामान्य कुटुंबातील माथाडी कामगाराचा मी मुलगा असून शरद पवारांचा निष्ठावंत मावळा आहे. त्यामुळेच उजळ माथ्याने फिरत आहे. येथील जनतेशी सातत्याने संपर्क ठेवून त्यांच्या अडचणीला उभा राहणारा मी कार्यकर्ता आहे. परळी सारख्या उरमोडी धरणा शेजारील गावांना पिण्याचे पाणी व शेतीसाठी उपसिंचन योजना नव्याने, तसेच बंद पडलेल्या योजना कार्यान्वित करू.तसेच कालव्याची अपुर्ण असलेली कामे मार्गी लावू.पाटेकर, केळवली येथील रिंगरोड रस्त्याचे काम मार्गी लावण्यासाठी प्रयत्न केला जाईल.अद्यापही अनेक गावातील लोक शासकीय योजनांपासून वंचीत असल्याने विविध शासकीय योजना लोकांपर्यंत घेऊन जाणार आहे.

अतिवृष्टीने बाधित झालेल्या गावांचे कायमस्वरूपी पुनर्वसन करून पर्यटनाच्या माध्यमातून या भागाला विकासात्मक दर्जा देत स्थानिकांना कायमस्वरूपी रोजगार मिळण्यासाठी प्रयत्न करणार आहे.या भागाच्या सर्वांगीण विकासासाठी मी कधीही कमी पडणार नाही. जनतेच्या प्रश्नांसाठी प्रसंगी रस्त्यावर उतरण्याची माझी धमक आहे. या मतदारसंघातील लोकांशी माझे व्यक्तिगत व घरोब्याचे संबंध असल्याने सगळीकडे माझ्या उमेदवारीमुळे उत्साहाचे वातावरण आहे. तर विरोधकांकडून माझ्यावर होत असलेल्या आरोपांमुळे ही निवडणूक जनतेने हातात घेतली आहे.

परळी, शेंद्रे जि.प. गटातील मतदारांनी आपल्या भावना व्यक्त करताना शशिकांत शिंदे निष्ठावंत व दिलेला शब्द पुर्ण करणारे, जनसंपर्क ठेवणारे आणि विकास कामांबद्दल संसदेत आवाज उठविणारे असल्याचे सांगून काम करणाऱ्या उमेदवाराच्या पाठीशी आम्ही असल्याचा शब्द मतदारांनी दिला. लोकांचे प्रश्न सोडविण्यासाठी, प्रगतीसाठी वाटेल ते करण्याची आपली तयारी असल्याने जनता आपल्या सोबत आहे. जनतेच्या पाठबळावरच सातारा लोकसभा मतदारसंघातील सर्वांगीण विकासाचा ध्यास घेतला असून, त्यामध्ये कुठेही कमी पडणार नाही असेही ते म्हणाले.

यावेळी शेंद्रे व परळी गटातील गावोगावच्या भेटीदरम्यान इंडिया आघाडीचे कार्यकर्ते, युवक व नागरिक उपस्थित होते. यावेळी महिलांनी आ. शशिकांत शिंदे यांचे औक्षण करून स्वागत केले. तर गावोगावच्या लोकांनी चौकाचौकात उपस्थित राहून उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

error: Content is protected !!