प्रतापगड कारखाना गिळंकृत करण्याचे षडयंत्र मी हाणून पाडले; खासदार उदयनराजेंचा घणाघात

जावळीतील मेळाव्यात महायुतीच्या पाठीशी राहण्याचे आवाहन

मेढा,(भूमिशिल्प वृत्तसेवा): माझ्या विरोधात लोकसभा निवडणुकीसाठी उभे असलेल्या उमेदवाराने सत्तेवर असताना प्रतापगड साखर कारखाना गिळंकृत करण्याचे षडयंत्र रचले होते. मी योग्य वेळी ते हाणून पाडले, म्हणून हा कारखाना शेतकऱ्यांच्या मालकीचा राहिला आहे, असा घणाघात महायुतीचे लोकसभा उमेदवार खासदार उदयनराजे भोसले यांनी केला.

सातारा लोकसभा निवडणूकीच्या अनुषंगाने आज मेढा, मानकुमरे पॉईंट ता.जावली येथे महायुतीच्या कार्यकर्त्यांचा भव्य मेळावा मोठ्या उत्साहात पार पडला. या मेळाव्यात उदयनराजे बोलत होते.

यावेळी आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले, जि.प.माजी उपाध्यक्ष वसंतराव मानकुमरे, जिल्हा बँक संचालक ज्ञानेश्वर रांजणे, सुनील काटकर, सौरभ शिंदे, जयदीप शिंदे, सयाजीराव शिंदे, शिवाजीराव मर्ढेकर, लक्ष्मणराव कडव, एकनाथ ओंबळे, पांडुरंग जवळ, गीताताई लोखंडे, कविता धनावडे, निर्मलाताई दुधाणे, कांतीबाई देशमुख, दत्ता पवार, रवी परामणे, अंकुश शिवणकर, तानाजीराव शिर्के, विनोद वेदे, अविनाश कारंजकर, अशोक भोसले, वीरेंद्र शिंदे, संदीप परामणे, समाधान पोकळे, भाजपा तालुकाध्यक्ष श्रीहरी गोळे, दादा पाटील, बाळासाहेब पाटील-सरपंच आनेवाडी, नाना पवार, विठ्ठल मोरे-संचालक प्रतापगड कारखाना, रामभाऊ शेलार, तुकाराम धनवडे, सागर धनावडे यांच्यासह जावळी तालुक्यातील सातारा विकास आघाडी, नगर विकास आघाडी, भारतीय जनता पक्षाचे सर्व आजी, माजी जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, पार्लमेंटरी बोर्ड सदस्य तसेच इतर समितीवर असलेले अशासकीय सदस्य व महायुती मधील सर्व घटक पक्षांचे प्रमुख पदाधिकारी या मेळाव्यास उपस्थित होते.

उदयनराजे म्हणाले, जावळी तालुक्यातील शेतकऱ्यांचे हित लक्षात घेऊन या ठिकाणी प्रतापगड कारखान्याची निर्मिती करण्यात आली. कालांतराने हा कारखाना अडचणीत आला. माझ्या विरोधातील उमेदवार त्यावेळी विद्यमान आमदार होते. सत्ता त्यांच्या ताब्यात होती. त्यांनी कारखाना वाचवायचा सोडून तो गिळंकृत करण्याचा विचार सुरू केला होता. त्याचवेळी कारखान्याच्या तत्कालीन अध्यक्ष सुनेत्राताई शिंदे, विद्यमान अध्यक्ष सौरभबाबा शिंदे हे मला भेटायला आले होते. कारखान्याची वस्तुस्थिती त्यांनी मला सांगितली आणि हा कारखाना शेतकऱ्यांच्या ताब्यात राहिला पाहिजे अशी मागणी केली. त्यानंतर मी या दोघांना घेऊन दिल्लीला गेलो होतो. आम्ही प्रयत्न करून हा कारखाना शेतकऱ्यांच्या ताब्यात ठेवला म्हणून आज तो पुन्हा नव्या जोमाने सुरू आहे.

स्वर्गीय अण्णासाहेब पाटील यांनी माथाडी युनियन स्थापन केले. त्यांच्या निधनानंतर माथाडी युनियनचे नेतृत्व संबंधिताने ताब्यात घेतले. त्या ठिकाणीही गैरव्यवहार केला. मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या घोटाळ्याप्रकरणी ते सध्या जामिनावर बाहेर आहेत. काँग्रेसच्या सत्तेच्या काळात घोटाळे करणाऱ्यांची इतकी सवय लोकांना लागले होती, की लोकांची नजरच मेलेली होती. घोटाळे करणे हा लोकशाहीचाच भाग आहे, असंच लोकांना वाटू लागलं होते. मात्र मोदींच्या नेतृत्वाखालील भाजपचे सरकार केंद्रात सत्तेवर आल्यानंतर घोटाळेबाजांना चाप बसला. गेल्या दहा वर्षात महायुतीतील एकाही नेत्यावर घोटाळ्याचा आरोप झालेला नाही. भाजप सरकारने केलेली कामे जनतेसमोर आहेत. जावळीसह जिल्ह्याचा विकास आणखी गतीने करायचा आहे. युती सरकारच्या काळात जिल्ह्याचा विकास अत्यंत गतीने सुरू असताना पुढच्या निवडणुकीमध्ये जनतेने काँग्रेसच्या बाजूने कल दिला त्याचे परिणाम आपण पंधरा वर्षे भोगले आहेत. आता पुन्हा भावनेच्या भरात आपण मतदान केले तर तेच दिवस पुन्हा येतील. त्यामुळे आपण सगळ्यांनीच आता सावध व्हायला पाहिजे. महायुतीच्या सरकारला सत्तेवर बसवलं पाहिजे. असेही उदयनराजे म्हणाले.

माझ्या विरोधातील उमेदवार चिमटा काढण्यात, डोळा मारण्यात पटाईत

माझ्या विरोधात जे उमेदवार उभे आहेत, त्यांनी आमदारकीच्या काळात किती प्रकल्प जावळीत आणले ते त्यांनी जाहीर करावे. लोकांचा विकास करण्याऐवजी भूलथापा मारून त्यांनी लोकांचा विश्वासघात केला आहे. हा माणूस चिमटा काढण्यात डोळे मारण्यात पटाईत आहे, तरी जनतेने अशा माणसापासून सावध व्हावे असे आवाहन उदयनराजेंनी केले.

काम करायला वेळ नाही पण काड्या लावायला भरपूर वेळ

काही लोकांना काड्या लावायला भरपूर वेळ असतो. आपल्या परिसरात मोठ्या प्रमाणावर डोंगर आहे. अशा काड्या लावणाऱ्यांपासून सावध राहिलो नाही तर अधोगतीचा वनवा पेटून प्रगती खुंटेल अशी टीकाही उदयनराजेंनी केली.

प्रदेशाध्यक्षांचे ज्ञान अपुरे..

विरोधी पक्षाच्या प्रदेशाध्यक्षांची पारावरची सभा नुकतीच केळघर मध्ये पार पडली. शिवेंद्रसिंहराजेंनी केलेल्या विकास कामामुळे त्यांचे डोळेही दिपले असतील. माझ्यामुळे काही लोकांना वारस नोंदीला अडचण येतात असे संबंधित प्रदेशाध्यक्ष म्हटले होते परंतु त्यांचे ज्ञान अपुरे आहे मी कधी कुणाच्या आडवं गेलेलो नाही, कुणाच्या नोंदी नियमानुसार घालायचे असतील तर ते काम आपण बसून करून घेऊ असेही उदयनराजे म्हणाले.

माझा शब्द खोटा ठरवू नका : शिवेंद्रसिंहराजे

लोकसभेला महायुतीचे उमेदवार खासदार उदयनराजे भोसले यांच्या पाठीशी राहून त्यांना मोठ्या मताधिक्याने निवडून आणण्याचा शब्द मी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिलेला आहे. हा शब्द जावळीतील जनतेने खोटा ठरवू नये असे आवाहन आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी यावेळी केले.

error: Content is protected !!