सातारा, (भूमीशिल्प वृत्तसेवा) : खासदार शरद पवार यांच्या निवासस्थानावरील हल्ल्याचा निषेध करावा तेवढा थोडाच आहे. परंतु, यामागे भाजपचा हात असल्याचा चुकीचा आरोप होत आहे. भाजपची संस्कृती व माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर पुरेपूर विश्वास व खात्री आहे. त्यामुळे यामागे भाजपच षडयंत्र सिध्द झाले तर आपण निश्चितपणे राजीनामा देऊ, असे स्पष्ट मत माढाचे खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांनी व्यक्त केले.
सुरवडी, ता. फलटण येथे खासदार निंबाळकर यांनी पत्रकारांशी संवाद साधला. शरद पवार हे महाराष्ट्रातील मोठे राजकीय नेतृत्व आहे. आम्ही राजकीय विरोधक असलो तरी महाराष्ट्राचे नेते म्हणून आम्हाला शरद पवार यांचा शंभर टक्के आदर आहे, असे स्पष्ट करून खासदार निंबाळकर म्हणाले, ‘‘लोकशाही पध्दतीत निषेध व्यक्त करण्यासाठी विविध मार्ग आहेत. कुणाच्या कुटुंबावर असा भ्याड हल्ला होत असेल तर भाजपचा माढा लोकसभा मतदारसंघाचा खासदार म्हणून मी त्याचा निषेध व्यक्त करतो. खासदार सुप्रियाताईंनी जर परिस्थिती व्यवस्थित हाताळली नसती, तर निश्चितपणे मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नव्हती.
You must be logged in to post a comment.