सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा): विधानसभेच्या निवडणुकीत आमदार शशिकांत शिंदे यांना पाडण्याचा हात नाही. त्यांना पाडायचे असते तर पहिल्या निवडणुकीत पाडले असते. मी कुरघोड्या करीत नाही. माझी नेहमी समोरासमोर दोन हात करण्याची सवय आहे. त्यामुळे माझा काटा काढाल तर मी तुमचा काटा काढलेला तुम्हाला कळायचे सुध्दा नाही, असा इशारा भाजपचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी आमदार शशिकांत शिंदे यांना दिला आहे.
कुडाळ, ता. जावळी येथे ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषद सदस्य वसंतराव मानकुमरे, सौरभ शिंदे, मोहनराव शिंदे व पदाधिकारी उपस्थित होते.
शिवेंद्रराजे म्हणाले, मांडीला मांडी लावून बसायचे आणि पाठीत खंजीर खुपसायचा ही माझी पध्दत नाही. मी अशा पध्दतीने राजकारण शिकलो नाही. राजकीय संघर्ष नको म्हणून आम्ही राजघऱाणे एकत्र आहे. मात्र, काही लोकांना हे बघवत नाही. ते राजकीय पोळ्या शेकत आहेत. अशा लोकांची लिस्ट माझ्याकडे आहे. त्यांचा बंदोबस्त केल्याशिवाय मी गप्प बसणार नाही. त्यामुळे मी कोणाला गृहित धरुन राजकारण करीत नाही. जे बरोबर येतील त्यांना सोबत घेऊन भविष्यातील राजकारणाची दिशा ठरवली जाणार आहे.
You must be logged in to post a comment.