सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) : सहकारी साखर कारखानदारी हा ग्रामीण भागातील अर्थकारणाचा कणा आहे. ऊस पिकामुळे शेतकरी सधन झाला असून शेतकऱ्यांची आर्थिक सुबत्ता वाढविण्यासाठी सहकारी साखर कारखानदारीला उभारी देण्यासाठी केंद्र सरकारने व्यापक धोरण राबवावे, अशी मागणी अजिंक्यतारा सहकारी साखर कारखान्याचे मार्गदर्शक संचालक आ. श्रीमंत छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी केंद्रीय उद्योग व व्यापार मंत्री ना. पियुष गोयल यांच्याकडे केली.
आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी दिल्ली येथे ना. गोयल यांची भेट घेऊन राज्यातील सहकारी साखर कारखानदारीसमोरील अडचणी विशद केल्या. यावेळी अजिंक्यतारा कारखान्याचे कार्यकारी संचालक जिवाजी मोहिते, सी.ए. शैलेंद्र जयस्वाल आदी उपस्थित होते.
महाराष्ट्रात ऊस हे मुख्य पीक असून उसाच्या शेतीचे प्रमाण जास्त आहे. त्यामुळे महाराष्ट्रामध्ये सहकारी साखर कारखान्यांची संख्या अधिक आहे. हे सहकारी साखर कारखाने सक्षमपणे चालू राहिले पाहिजेत तरच ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा फायदा होणार आहे. आज सहकारी साखर कारखान्यांपुढे अनेक अडचणी आहेत. त्या प्राधान्याने सोडवणे आवश्यक आहे. सहकारी साखर कारखाने सक्षमपणे चालू राहावेत आणि त्यामाध्यमातून शेतकऱ्यांची अधिकाधिक आर्थिक उन्नती व्हावी, यासाठी ठोस उपाययोजना केंद्र सरकारने राबवाव्यात, अशी आग्रही मागणी आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी ना. गोयल यांच्याकडे केली.सविस्तर चर्चेनंतर ना. गोयल यांनी सहकारी साखर कारखानदारीला उर्जितावस्था मिळण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना राबविण्याबाबत सकारात्मकता दर्शवली.
You must be logged in to post a comment.