अखेर मंत्रिमंडळाचे खातेवाटप जाहीर

मंत्रिमडळाच्या खाते वाटपात सातारच्या मंत्र्यांना महत्त्वाची खाती

सातारा,(भूमिशिल्प वृत्तसेवा) : मंत्रिमंडळाच्या खाते वाटपामध्ये सातारा जिल्ह्यातील चार कॅबिनेट मंत्र्यांकडे राज्याच्या महत्त्वाच्या खात्यांची सूत्रे सोपवण्यात आली आहेत. ना. मकरंद पाटील यांना मदत व पुनर्वसन खाते देण्यात आले आहे. नामदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांना सार्वजनिक बांधकाम, नामदार शंभूराजे देसाई यांना पर्यटन तर नामदार जयकुमार गोरे यांना ग्रामविकास खाते देण्यात आले आहे.

राज्याच्या मंत्रिमंडळामध्ये सातारा जिल्ह्यातील चार आमदारांचा कॅबिनेट मंत्री पदाचा दर्जा देऊन समावेश करण्यात आला होता. या मंत्र्यांकडे कोणती खाती असणार याबाबत संपूर्ण जिल्ह्यासह राज्याच्या जनतेचे लक्ष लागून राहिले होते. नागपूर येथे शपथविधी सोहळा पार पडल्यानंतर कुठल्या मंत्र्याकडे कुठले खाते येणार याबाबत कार्यकर्त्यांमध्ये उत्सुकता ताणली गेली होती. अखेर हिवाळी अधिवेशनाच्या अखेरच्या दिवशी म्हणजेच आज शनिवारी रात्री खाते वाटपाची यादी जाहीर झाली. यामध्ये महाराष्ट्रात सर्वात जास्त मंत्री पदे मिळालेल्या सातारा जिल्ह्याकडे राज्याची महत्त्वाची सूत्रे आलेली आहेत.

ग्रामविकास खाते हे भारतीय जनता पक्षाचे संकटमोचक म्हणून राज्याला परिचित असलेले गिरीश महाजन यांनी याआधी सांभाळलेले होते. आता त्यांचे खाते आमदार जयकुमार गोरे यांना देण्यात आले असल्याने पक्षाने गोरे यांच्यावर मोठी जबाबदारी सोपवल्याचे पाहायला मिळते. राज्यातील सार्वजनिक बांधकाम खाते हे देखील महत्त्वाचे खाते आहे.भाजपच्या वतीने मागील मंत्रिमंडळात रवींद्र चव्हाण यांनी हे खाते सांभाळले होते. आता रवींद्र चव्हाण यांना भाजपने प्रदेशाध्यक्ष बनवण्याची तयारी सुरू केली असल्याने त्यांच्या जागी हे महत्त्वाचे खाते आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांना देण्यात आले आहे. पर्यटनाच्या अनुषंगाने देखील राज्यासह सातारा जिल्ह्यामध्ये मोठी कामे सुरू आहेत. शिवसेनेने साताऱ्याचे माजी पालकमंत्री शंभूराजे देसाई यांना पर्यटनाचे खाते दिले आहे. तर मदत व पुनर्वसन खाते देऊन राष्ट्रवादीने नामदार मकरंद पाटील यांच्यावर फार मोठी जबाबदारी दिलेली आहे.दरम्यान खाते वाटप जाहीर होताच मंत्र्यांच्या मतदार संघात कार्यकर्त्यांनी जल्लोष केला आहे.

मंत्र्यांचे खाते वाटप पुढील प्रमाणे :

१) देवेंद्र फडणवीस – गृह, ऊर्जा, कायदा आणि न्यायव्यवस्था.

२) एकनाथ शिंदे – नगरविकास, गृहनिर्माण.

३) अजित पवार – अर्थ, राज्य उत्पादन

४) चंद्रशेखर बावनकुळे – महसूल.

५) राधाकृष्ण विखे- पाटील – जलसंपदा (गोदावरी आणि कृष्णा खोरे).

६) हसन मुश्रीफ – वैद्यकीय शिक्षण.

७) चंद्रकांत पाटील – उच्च व तंत्रशिक्षण आणि संसदीय कार्यमंत्री.

८) गिरीश महाजन – जलसंपदा (विदर्भ, तापी आणि कोकण).

९) गुलाबराव पाटील – पाणी पुरवठा आणि स्वच्छता.

१०) गणेश नाईक – वनमंत्री.

११) दादा भुसे – शालेय शिक्षण

१२) संजय राठोड – जलसंधारण.

१३) धनंजय मुंडे – अन्न व नागरी पुरवठा.

१४) मंगलप्रभात लोढा – कौशल्य विकास.

१५) उदय सामंत – उद्योग आणि मराठी भाषा.

१६) जयकुमार रावल – मार्केटिंग आणि प्रोटोकॉल.

१७) पंकजा मुंडे – पर्यावरण आणि हवामान बदल, पशुपालन.

१८) अतुल सावे – ओबीसी, डेअरी विकास आणि अक्षय ऊर्जा.

१९) अशोक उईके – आदिवासी विकास मंत्रालय.

२०) शंभूराज देसाई – पर्यटन, खाण व स्वातंत्र्य सैनिक कल्याण मंत्रालय.

२१) आशिष शेलार – माहिती व तंत्रज्ञान.

२२) दत्तात्रय भरणे – क्रीडा व अल्पसंख्याक विकास व औकाफ मंत्रालय.

२३) अदिती तटकरे – महिला व बालविकास.

२४) शिवेंद्रराजे भोसले – सार्वजनिक बांधकाम.

२५) माणिकराव कोकाटे – कृषी.

२६) जयकुमार गोरे – ग्रामविकास, पंचायत राज.

२७) नरहरी झिरवाळ – अन्न व औषध प्रशासन.

२८) संजय सावकारे – कापड.

२९) संजय शिरसाट – सामाजिक न्याय.

३०) प्रताप सरनाईक – वाहतूक.

३१) भरत गोगावले – रोजगार हमी,फलोत्पादन.

३२) मकरंद पाटील – मदत व पुनर्वसन.

३३) नितेश राणे – मत्स्य आणि बंदरे.

३४) आकाश फुंडकर – कामगार.

३५) बाबासाहेब पाटील – सहकार.

३६) प्रकाश आबिटकर – सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण.

error: Content is protected !!