मुख्यमंत्र्यांच्या कौतुकात जिल्ह्यातील महायुतीचा हात आखडता

आमदारांच्या तुलनेत मुख्यमंत्री ,उपमुख्यमंत्र्यांच्या अभिनंदनाचे तुरळकच फ्लेक्स

सातारा,(भूमिशिल्प वृत्तसेवा) : मुंबईत गुरुवारी सायंकाळी राज्याच्या नूतन मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचा शपथविधी सोहळा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला.महायुतीतील आमदारांना निवडून आणण्यासाठी जीवाचे रान करणाऱ्या मुख्यमंत्री,उपमुख्यमंत्र्यांचे अभिनंदन करताना जिल्ह्यातील नेतेमंडळी,पदाधिकाऱ्यांनी मात्र उत्साह दाखवल्याचे दिसत नाही. प्रत्यक्ष शपथविधीपूर्वीच काही दिवस अगोदर नव्या मुख्यमंत्र्यांचे नाव निश्चित झाले होते.मात्र जिल्ह्यातील महायुतीच्या आमदारांचे अभिनंदन करण्यात तत्परता दाखवणाऱ्या लहान-मोठ्या पदाधिकारी, ठेकेदार व नेत्यांनी मात्र फ्लेक्स लावण्यात आखडता हात घेतल्याने मुख्यमंत्र्यांच्या कौतुकात जिल्ह्यातील आठही मतदारसंघातील जबाबदार घटकांची उदासीनता स्पष्ट झाल्याचे राजकीय जाणकार व्यक्त करत आहेत.

याबाबत अधिक माहिती अशी की, नुकत्याच झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत जिल्ह्यातील सर्वच आठही मतदारसंघात महायुतीचे उमेदवार मोठ्या फरकाने निवडून आले. निकाल जाहीर होताच आणि निकालापूर्वीही जिल्ह्यात ठिकठिकाणी त्या त्या ठिकाणच्या आमदारांचे अभिनंदन करणारे फ्लेक्स (काहींनी नियमानुसार परवानगी घेऊन आणि अनेकांनी विना परवाना सुद्धा) मोठ्या चढाओढीने उभारलेले पहायला मिळाले.

भाजप शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या जबाबदार पदाधिकारी व लहान- मोठ्या कार्यकर्त्यांबरोबरच ठेकेदार मंडळींनीही मोठ्या इर्शेने आमदारांचे अभिनंदन करणारे फ्लेक्स लावून आपली निष्ठा दाखवली. मात्र मुख्यमंत्रीपदी विराजमान झालेले देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री पदाची धुरा सांभाळलेले मूळचे सातारा जिल्ह्याचे भूमिपुत्र असणाऱ्या एकनाथ शिंदे व अजित पवार यांच्या अभिनंदनाचे फलक लावण्यात शपथविधीनंतर दुसऱ्या दिवशीपर्यंत तरी पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये उदासीनता दिसत होती.

शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहून आणि त्यापूर्वीही संभाव्य मंत्र्यांना भेटून त्यांच्यासोबत फोटोबाजी करणारे व सोशल मीडियावर त्याचा भडीमार करणारे जिल्ह्यातील जबाबदार पदाधिकारी नूतन मंत्र्यांचे अभिनंदन करण्यात फारसे उत्साही नसल्याचे चित्र दिसून येत आहे. याची मोठी चर्चा जिल्ह्यातील जनसामान्यात सुरू आहे.

निवडणुकीपूर्वी भाजपमध्ये मोठ्या प्रमाणावर इन्कमिंग सुरू होते. त्यादरम्यान जुन्या – नव्या अनेक कार्यकर्त्यांना पक्षाने मोठ्या प्रमाणावर पदांची खिरापत वाटली होती. लेटरहेड व व्हिजिटिंग कार्डची शोभा वाढवण्यासाठी पदे मिरवणाऱ्या काही चमकोबहाद्दरांना तर मुख्यमंत्र्यांच्या अभिनंदनाचा विसरच पडला आहे, असेच म्हणावे लागेल.

error: Content is protected !!