सातारा, (भूमीशिल्प वृत्तसेवा) :कास पठारावरील नाईट जंगल सफारी या उपक्रमास प्राणिमित्रांनी विरोध केल्यानंतरही उपवनसंरक्षक महादेव मोहिते यांच्या हस्ते या उपक्रमाचे उद्घाटन झाले. दरम्यान, सहायक वनसंरक्षक सुधीर सोनावले, सातारा वनक्षेत्रपाल निवृत्ती चव्हाण, जावली वनक्षेत्रपाल रंजनसिंह परदेशी, कास पठार समितीचे अध्यक्ष मारुती चिकणे, उपाध्यक्ष दत्तात्रेय किर्दत, सर्व सदस्य, वनविभागाचे कर्मचारी उपस्थित होते.
या नाईट जंगल सफारी उपक्रमातून वन्यप्राणी व समृद्ध निसर्गसंपदेचे दर्शन होणार असून, रात्रगस्तीचा दुहेरी फायदा होण्यास मदत होईल. तसेच पूर्वीचाच रस्ता या सफारीसाठी असून या सफारीसाठी वेगळा मार्ग, पायवाटा नसल्याने वन्यप्राण्यांना कोणताही व्यत्यय येणार नाही. तसेच मोठ्या संख्येने असलेले कृत्रिम पाणवठे व येथील व्यवस्थापन पाहता कास पठार समितीचे कार्य कौतुकास्पद असल्याचे उपवनसंरक्षक महादेव मोहिते यांनी म्हटले आहे.
दरम्यान, कास पठारावर दिवसा सायकलीद्वारे पर्यटन करता यावे, यासाठी १० सायकली दाखल झाल्या आहेत. यामुळे पर्यावरण संतुलनास मदत होणार आहे. तसेच कृत्रिम पाणवठ्यात पाणी टाकण्यासाठी एक ट्रॅक्टरही उपलब्ध झाला आहे.
You must be logged in to post a comment.