ज्येष्ठ नागरिक,दिव्यांग पूर्व तपासणी शिबिराचे उद्घाटन

कोरेगाव,(भूमिशिल्प वृत्तसेवा): दिव्यांग बंधू-भगिनी तसेच ६० वर्षांवरील ज्येष्ठ नागरिक यांच्यासाठी दिनांक २७ व २८ फेब्रुवारी रोजी कोरेगावात पूर्व तपासणी व नोंदणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे .या शिबिराचे उद्घाटन खासदार श्रीनिवास पाटील तसेच इतर मान्यवरांच्या हस्ते उत्साहात झाले.

प्रशासनामध्ये मोठी क्षमता आहे. गोरगरीब जनतेचे प्रशासन कल्याण करू शकते. तसे प्रयत्न प्रशासन नेहमी करीत असते. दिव्यांग आणि ज्येष्ठ नागरिक यांच्यापर्यंत पूर्णक्षमतेने पोहोचावे, असे प्रतिपादन श्री. पाटील यांनी यावेळी केले. प्रांताधिकारी ज्योती पाटील, माजी सभापती राजाभाऊ जगदाळे, जिल्हा परिषद सदस्य भीमराव पाटील, सहाय्यक गटविकास अधिकारी मिलिंद मोरे आदींनी यावेळी मनोगत व्यक्त केले. तहसीलदार अमोल कदम गटविकास अधिकारी क्रांती बोराटे नगराध्यक्ष दिपाली बर्गे पंचायत समिती सभापती शीला झांजुरणे पंचायत समिती उपसभापती संजय साळुंखे यावेळी उपस्थित होते.

सुमारे ७६५ दिव्यांग व्यक्तींनी ऑनलाईन रजिस्ट्रेशन केले असून दिवसभरात जागेवरच शिबिराच्या ठिकाणी दोनशेहून अधिक दिव्यांग बंधू-भगिनींनी रजिस्ट्रेशन केले आहे, अशी माहिती प्रशासनाने दिली. तसेच सोळाशे ज्येष्ठ नागरिकांनी ऑनलाइन रजिस्ट्रेशन केले आहे .जास्तीत जास्त गरजूंनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन देखील करण्यात आले आहे. याबाबत अधिक माहिती अशी की; नवी दिल्ली येथील सामाजिक न्याय व अधिकारिता मंत्रालय यांच्या योजनेतून हा लोकोपयोगी उपक्रम राबविण्यात येत आहे. सातारा जिल्हा प्रशासन आणि सातारा जिल्हा परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने हे शिबिर होणार आहे. कृत्रिम अवयव आणि सहाय्यभूत साधने यांचे मोफत वाटप करण्याच्या उपक्रमाचा प्राथमिक भाग म्हणून पूर्व तपासणी आणि नोंदणी शिबिर होत आहे. हे दोन दिवसांचे शिबिर असून २७ फेब्रुवारी रोजी दिव्यांगाकरिता आणि २८ फेब्रुवारी रोजी ज्येष्ठ नागरिकांकरिता हे शिबिर आहे. कोरेगाव येथील सरस्वती विद्यालयात हे शिबिर आहे.

या योजनेअंतर्गत ज्येष्ठ नागरिक व दिव्यांगांना त्यांच्या गरजेनुसार व अलिम्को या संस्थेच्या तज्ज्ञांमार्फत सल्ला देण्यात येणार आहे.या उपक्रमाअंतर्गत ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांगांना; पूर्व तपासणी आणि नोंदणी शिबिर झाल्यानंतर संबंधित लाभार्थ्याच्या गरजेनुसार दुसऱ्या टप्प्यात तीन चाकी सायकल, व्हीलचेअर,काळ्या कँलिबर्स, कुबड्या, मोटर सायकल ,कृत्रिम हात पाय, श्रवणयंत्रे, ब्रोल किटस, एम आर टिप्स, नंबरचा चष्मा ,स्मार्टफोन इत्यादी उपकरणे मोफत दिली जाणार आहेत. या योजनेचा लाभ घेण्यासाठी संबंधित लाभार्थ्याने आपल्या जवळच्या नागरी सुविधा केंद्रात नाव नोंदणी करावी ,असे आवाहन करण्यात आले आहे.

ज्येष्ठ नागरिकांनी आधार कार्ड, रेशन कार्ड, दोन पासपोर्ट साईज फोटो ,उत्पन्नाचा दाखला तसेच दिव्यांगांनी सिव्हिल सर्जन यांचा दिव्यांगत्वाचा दाखला, आधार कार्ड ,रेशन कार्ड ,दोन पासपोर्ट साईज फोटो आणि उत्पन्नाचा दाखला अशी कागदपत्रे सादर करणे आवश्यक आहे .१ लाख ८० हजार इतकी उत्पन्नाची मर्यादा आहे .दिव्यांगांना कृत्रिम अवयव, सहाय्यभूत साधने मोफत मिळावी तसेच ज्येष्ठ नागरिकांना सहाय्यभूत साधने मोफत मिळाववीत, हा या शिबिरामध्ये उद्देश असून जास्तीत जास्त लाभार्थ्यांनी संपर्क साधून लाभ घ्यावा असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

error: Content is protected !!