सातारा,(अजित जगताप): महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये प्रभावी नेता म्हणून प्रहार संघटनेचे आमदार ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू यांचे नाव चर्चेत असते. सातारा जिल्ह्याच्या दौऱ्यामध्ये ‘दिव्यांग आपल्या दारी’अभियानासाठी आ.बच्चू कडू आले होते. भरपूर वेळ देऊन दिव्यांग त्यांच्या समस्या जाणून घेतल्या व तातडीने उपाययोजना करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या. यावेळी पत्रकारांनी त्यांच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला असता राज्यात पंधरा ठिकाणी विधानसभा निवडणूक लढवणार आहे. माण-खटाव मतदारसंघात १२० टक्के उमेदवार उभा करणार असल्याचा दावा करत खडसावून सांगितले. तसेच चार मतदार संघामध्ये २४ हजार दिव्यांग बांधवांनी जर मतदान केले तर ते आमदार असलेले उमेदवार पडतील. असे त्यांनी स्पष्ट केले. यामुळे सातारा जिल्ह्यातील माण-खटाव मतदारसंघात चर्चेला चांगलेच उधाण आले आहे.
विशेष म्हणजे माण खटाव विधानसभा मतदारसंघांमध्ये आत्तापर्यंत मराठा आमदार होऊ शकलेला नाही. आरक्षणामुळे व मराठा तितका मिळवावा व निवडणुकीत आवडेल त्याला आडवावा अशी राजकीय खेळी केली आहे.त्यामुळे आमदार जयकुमार गोरे यांनी अपक्ष, काँग्रेस व आता भाजप आमदारकी मिळवली आहे.आता २०२४ च्या निवडणुकीत प्रहार संघटनेचे नेते ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू यांनी साताऱ्यात येऊन माण-खटाव विधानसभा मतदारसंघाची निवडणूक लढवणार असल्याचे जाहीर केले. राजकीय चर्चेला उधाण आलेले आहे.
वास्तविक पाहता २००९ सालापर्यंत माण खटाव विधानसभा मतदारसंघ राखीव असल्याने आदरणीय प्रभावती शिंदे, विष्णुपंत सोनवणे, धोंडीराम वाघमारे, तुकाराम तुपे, संपतराव अवघडे यांनी विधानसभेत आपलं अस्तित्व दाखवून दिले. त्यानंतर आमदार जयकुमार गोरे यांचे गोरेपर्व सुरू झाले . खटावचा विचार विचार केला तर त्या ठिकाणीही गेली वीस वर्ष भाऊसाहेब गुदगे,डॉ. दिलीप येळगावकर हे आमदार झाले होते. विशेषतः माण खटाव मतदारसंघांमध्ये मराठा समाजातील सक्षम व धाडसी नेतेगणांची माळ आहे. परंतु ,या माळेमध्ये पुढे कोण आहे? हे पाहूनच मागील नेत्याला पराभवाला सामोरे जावे लागत आहे.
तसं पाहिलं तर माण खटाव मतदारसंघात प्रभाकर देशमुख, डॉक्टर संदीप पोळ ,अनिल देसाई, रणजीत सिंह देशमुख, डॉक्टर दिलीप येळगावकर, शेखर गोरे, असे अनेक नेते गण मंडळी आहेत.महिलांचा विचार केला तर चेतना सिन्हा, सुवर्णा पोरे, सोनाली पोळ, भारती पोळ, कविता म्हात्रे, शुभदा देशमुख, सोनिया गोरे यांचेही काम लक्षणीय आहे.
२०१९ रोजी झालेल्या विधानसभा निवडणुकीत आमदार जयकुमार गोरे यांना ९१,५६९ प्रभाकर देशमुख ८८ हजार ४२६ शेखर गोरे ३६३९३ अमृत सूर्यवंशी ३३४० वंचित बहुजन आघाडीचे प्रमोद गावडे १९२७ व नोटा १५२५ अशी मते मिळाली.आता परिस्थिती पूर्ण बदललेले असून एक मराठा लाख मराठा सर्वत्र नारा दिला जात आहे. परंतु, अद्यापही आरक्षण मिळाले नाही.तीच अवस्था धनगर समाजाची आहे.
पालवण या ठिकाणी एका महिलेवर रस्त्यामध्ये मारहाण करण्यात आली. त्यामुळे सरकार विरोधात चांगलेच रान पेटवले गेले तर दुसऱ्या बाजूला भाजपचे जिल्हाध्यक्ष असलेल्या खटाव तालुक्यातील धैर्यशील कदम यांच्या गावातच जातीयवाद्यांनी एका तरुणाचा खून करून धार्मिक स्थळाचे नुकसान केले. सध्या माण खटाव तालुक्यातील बेकायदेशीर वाळू व्यवसाय बंद असला तरी या पाठीमागे अनेक राजकीय ध्येयाने प्रेरित झालेल्या लोकांचा हात असून अनेक अधिकाऱ्यांचे हात ओले करून बेकायदेशीर धंदे राजरोसपणाने केले जात होते. आता हे सर्व मुद्दे निवडणुकीत येणार की दारू-पाकीट याची युती होऊन मतदार मत देतील ? हे बघणे उत्सुकतेचे ठरणार आहे.
सध्या प्रहार संघटनेच्या आमदार बच्चू कडू यांनी जर उमेदवार उभा केला तर त्याचा नेमका फायदा कुणाला होणार ? याचे अद्याप उत्तर शोधणे कठीण आहे. कारण, माण खटावमध्ये सर्वाधिक ताकद ही पैशाची असून त्यानंतर जातीला दुय्यम स्थान दिले जाते.
प्रहार संघटना, वंचित बहुजन आघाडी, रिपब्लिकन पक्ष व शेतकरी संघटना व इतर संघटनेचे उमेदवारी जरी असली तरी वंचित बहुजन आघाडीने मारलेली मुसंडी ही कोणत्या तरी उमेदवाराला अडचणीचे ठरेल. हे अजून स्पष्ट झालेले नाही. कारण, प्रस्थापित व्यवस्थेविरुद्ध लढण्यासाठी वंचित बहुजन आघाडीने ताकद निर्माण केले आहे. ही ताकद वाया जाऊ नये. कारण, वंचित घटकाला न्याय देताना कुणावर अन्याय होऊ नये. याची ही चर्चा सुरू झाली आहे. दरम्यान, सातारा जिल्ह्यातील सातारा-जावळी, कोरेगाव व माण खटाव मतदार संघाचे भवितव्य मतदारांवर अवलंबून राहणार आहे. हे मात्र खरे.
You must be logged in to post a comment.