शेतीविषयी गोडी वाढवणे हीच नाईक यांना आदरांजली : क्षीरसागर

कोरेगाव,(भुमिशिल्प वृत्तसेवा): महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री कैलासवासी वसंतराव नाईक यांचे योगदान अमूल्य असून कृषी दिनाच्या या दिवशी शेतीविषयी तरुण पिढीपर्यंत सर्वच घटकात शेती विषयी गोडी वाढवणे आणि त्यासाठी विशेष प्रयत्न करणे हीच वसंतराव नाईक यांना खरी आदरांजली ठरेल, असे प्रतिपादन प्रसिद्ध वक्ते, लेखक, कवी यशेंद्र क्षीरसागर यांनी केले.

कोरेगाव पंचायत समितीमध्ये आयोजित कृषी दिनाच्या कार्यक्रमात प्रमुख वक्ते म्हणून ते बोलत होते. पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी श्रीमती क्रांती बोराटे यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती. कृषी अधिकारी श्री शेळके, सहाय्यक गटविकास अधिकारी सपना जाधव, कृषी विस्ताराधिकारी संजय बर्गे इत्यादी मान्यवर यावेळी उपस्थित होते.

यावेळी श्री क्षीरसागर म्हणाले,”1963 ते 1975 असे बारा वर्षे महाराष्ट्राचे सर्वाधिक काळ वसंतराव नाईक हे मुख्यमंत्री होते. शेतीवर निस्सीम श्रद्धा आणि प्रेम असलेले श्री.नाईक कृषिप्रेमी नागरिकांना आदर्श आहेत. त्यांनी महाराष्ट्रात चार कृषी विद्यापीठे स्थापन केली. कोराडी, खापरखेडा इत्यादी ठिकाणी औष्णिक विद्युत केंद्र त्यांनी स्थापन केली. अत्यंत शांत आणि संयमी वृत्तीच्या श्री नाईक यांनी कित्येक समस्यांमधून कुशलतेने मार्ग काढून महाराष्ट्राला अग्रेसर ठेवले .केवळ कृषी क्षेत्र नव्हे; तर इतर क्षेत्रातही त्यांची कामगिरी अजोड आहे.मराठीला राजभाषेचा दर्जा त्यांच्याच काळात दिला गेला. तसेच पाठ्यपुस्तक निर्मिती मंडळ त्यांनी स्थापन केले. जीवन शिक्षण तसेच; शेतकरी मासिक सुरू करून ज्ञानाच्या विस्ताराचे महत्त्वाचे कार्य केले. माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी त्यांना “भारत मातेचे थोर सुपुत्र” अशा शब्दात गौरविले आहे. आजच्या काळात शेतीपासून तरुण पिढी दुरावत आहे. शेतीवरील प्रेम कमी होत चालले आहे. त्यामुळे शेती हा केवळ उपजीविकेचा विषय नसून तो आपुलकीचा ,श्रद्धेचा विषय आहे, ही भावना नव्या पिढीच्या मनात ठसविणे गरजेचे आहे .तसेच नव्या तंत्रज्ञानामुळे शेतीतील उत्पादन प्रचंड वाढू शकते हा सुद्धा विश्वास नव्या पिढीमध्ये निर्माण करायला हवा.” आपल्या भाषणात त्यांनी बीजमाता पद्मश्री प्राप्त राहीबाई पोपेरे, पद्मश्री डॉक्टर अनिल राजवंशी, पद्मश्री सुभाष पाळेकर अशा अनेक व्यक्तींचे शेतीतील योगदान विशद केले.

श्रीमती बोराटे यांनी आपल्या मनोगतात कृषी खात्याच्या विविध योजनांचा आढावा घेऊन या प्रयत्नांचे कौतुक केले उच्चशिक्षित तरुण-तरुणी शेतीकडे वळण्याची काही उदाहरणे समाजात आढळतात. त्याचे त्यांनी विशेष कौतुक केले.

यावेळी आदर्श शेतकऱ्यां शेतकऱ्यांनी उपयुक्त मनोगत व्यक्त केले .श्री संजय बर्गे यांनी सूत्रसंचालन केले.

error: Content is protected !!