मानसिक आरोग्याबाबत समाजामध्ये जनजागृती होणे आवश्यक : डॉ. युवराज करपे

जिल्हा रुग्णालयात मानसिक स्वास्थ व रुग्णांचे हक्क याबाबत जनजागृती

सातारा,(भूमिशिल्प वृत्तसेवा): मानसिक आजाराबाबत समाजामध्ये अनेक गैरसमज आहेत, पूर्वीच्या काळात लोकांना मानसिक आजाराबाबत माहिती नसल्यामुळे भूतबाधा, करणी, भानामती, अंगात येणे अशा प्रकारचे अज्ञान समाजामध्ये मोठ्या प्रमाणात आपल्याला बघायला मिळायचे. अशा अज्ञानामुळे समाजातील लोकांची ऊर्जा खर्च होते. त्याचबरोबर वेळ देखील वाया जातो.समाजातील अनेक प्रतिष्ठित लोकांना मानसिक आरोग्यासंदर्भात समर्पक अशी माहिती नसल्यामुळे मानसिक आरोग्याबाबत समाजामध्ये जनजागृती होणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. युवराज करपे यांनी केले.

मानसोपचार विभाग जिल्हा मानसिक आरोग्य कार्यक्रम, जिल्हा रुग्णालय,सातारा व विधी सेवा प्राधिकरण,जिल्हा सत्र न्यायालय सातारा यांच्या संयुक्त विद्यमाने मानसिक रुग्ण व नातेवाईक यांच्यासाठी शासनामार्फत पुरवल्या जाणाऱ्या सेवा व मानसिक रुग्णांचे हक्क याबाबतची माहिती देण्यासाठी क्रांतिसिंह नाना पाटील शासकीय जिल्हा रुग्णालय येथे जनजागृती कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी अध्यक्षस्थानावरून जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.युवराज करपे बोलत होते.कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे व मार्गदर्शक म्हणून विधी सेवा प्राधिकरणाच्या सचिव न्यायाधिश श्रीमती निना बेदरकर व ॲड.आशिष राठोड होते

यावेळी अति.जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. इनामदार, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. विकास वडगाये, सर्जरी विभाग प्रमुख डॉ. राहुल जाधव, जिल्हा नेत्रचिकित्सक डॉ.सी.पी. काटकर, प्रशासकीय अधिकारी डॉ. ज्ञानेश्वर हिरास, डॉ.सुभाष कदम,मानसोपचार तज्ञ डॉ. देविका नायर, एन.सी.डी समन्वयक डॉ. गितांजली टकले, मेट्रन श्रीमती. काळसेकर, नर्सिंग कॉलेजचे प्राचार्य श्रीमती, सरला पुंड आदी उपस्थित होते.

डॉ. करपे म्हणाले, माणसाचे शरीर आजारी पडते तसे मन देखील आजारी पडते, मानसिक आजाराची कारणे म्हणजे गुणसुत्रांमधील अभाव, अनुवंशिकता ताण तणाव, सभोवतालचे तणावपुर्ण वातावरण ही आहेत. शारिरीक आजाराची लक्षणे ही बाहेरुन असतात, त्यामुळे ती लक्षात येतात पण मानसिक आजाराची लक्षणे ही आतून असतात, त्यामुळे ती लक्षात येणयास वेळ लागतो. अचानक आयुष्यात ताणाचे प्रमाण वाढले तर ज्याच्या मेंदूमधील सर्कीट मजबूत आहेत त्यांना तो ताण पेलवता येतो पण ज्यांना तो ताण पेलवता येत नाही अशा लोकांना चिंता रोग, भीती, नैराश्य यासारखे मानसिक आजार होताना आढळतात. येणारा ताणे हाताळण्याची पध्दत याचे समीकरण आपणास साधता आले पाहिजे.

एक तृतीयांश लोकांमध्ये मानसिक दिव्यांगत्व राहू शकते. त्यांना कायमस्वरुपी औषधे घेणे गरजेचे आहे. आपण जितक्या लवकर उपचार घेवू तेवढ्या लवकर बरे होण्यास मदत होते. तरी गरजुंनी जिल्हा रुग्णालय, सातारा येथील मानसोपचार विभागामध्ये मिळणाऱ्या सेवा सुविधांसोबत शासनामार्फत चालू करणेत आलेल्या मानसिक आरोग्याबाबत ऑनलाईन समुपदेशन व मानसिक आजाराची माहिती देणेत येणाऱ्या मोफत टोल फ्री क्रमांक १४४१६ सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन डॉ.करपे यांनी केले.

श्रीमती निना बेदरकर म्हणाल्या, समाजामध्ये मानसिकरित्या आजारी असणाऱ्या रुग्णांना व नातेवाईकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. सदर मानसिक आजारी व्यक्तीला कामाच्या ठिकाणी, कुटुंबामध्ये, वैयक्तीक संपत्तीबाबत तसेच इतर काही कायदेशीर बाबींना तोड द्यावे लागते. अशा वेळी त्यांना योग्य त्या कायदेशीर सल्ल्याची गरज असते आणि तो सल्ला मोफत देण्याचा मानस शासनाचा असलेबाबतचे मत व्यक्त केला. त्यासाठी जिल्हा रुग्णालय सातारा येथे विधी सेवा प्राधिकरण क्लिनिक लवकरच सुरू करणेत येणार आहे. कायद्याचे ज्ञान असलेली व्यक्ती सदर क्लिनिक मध्ये उपस्थित राहून मानसिक रुग्णांच्या अडचणी समजून घेवून त्यांना कायदेशीर मदत व त्यांचे असलेले हक्क यांची माहिती देणार आहे.

मानसोपचार तज्ञ डॉ. देविका नायर यांनी मानसिक आजार व त्याबाबतच्या समाजामध्ये असलेले गैरसमज तसेच औषधोपचाराची गरज याबाबतची सखोल माहिती दिली.

तसेच मनोविकृती सामाजिक कार्यकर्ती अपर्णा बल्लाळ यांनी जिल्हा मानसिक आरोग्य कार्यक्रमाची माहिती उद्दिष्ट्ये व कार्यक्रमांतर्गत देणेत येणाऱ्या सेवा याबाबतची माहिती दिली.

प्रास्ताविक श्री.सचिन थिटे तर सुत्रसंचालन श्रीमती अपर्णा संभुदास यांनी केले, व आभार शोभा चव्हाण यांनी मानले.

error: Content is protected !!