सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) : सातारा शहरातील विविध प्रश्न मार्गी लावताना सत्ता असो वा नसो सातारकरांचे प्रश्न सोडवण्यासाठी नेहमीच प्रामाणिक प्रयत्न केला. सातारकर नागरिकांच्या समस्या मार्गी लावणे हेच आपले कर्तव्य असून हे कर्तव्य कायम पार पाडत राहू, असे प्रतिपादन आ. श्रीमंत छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी केले.
प्रभाग क्र. २० मधील दस्तगीर कॉलनी येथे आ. शिवेंद्रसिंहराजे यांच्या मार्गदर्शन व राज्य शासनाकडून आणलेल्या वैशिष्टय़पूर्ण योजनेतून नगरसेविका सौ. लीना गोरे आणि राजू गोरे यांच्या प्रयत्नातून उभारण्यात येत असलेल्या ओपन जिम व बास्केटबॉल कोर्टच्या कामांचा शुभारंभ आ. शिवेंद्रसिंहराजे यांच्या उपस्थितीत करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. यावेळी नगरसेविका सौ. गोरे, शकील बागवान, अस्लमभाई कुरेशी, राजू गोरे, सलीम शेख, दिपक शिंदे, समीर शेख, दिलावर शेख, सिकंदर खाटीक, दिगंबर सांडगे, रविंद्र भणगे ,विरेन जानी, संदिप भणगे, अमिर हकीम, राजू निवळे, गणेश नारकर, सुनिल रामाणे आदी उपस्थित होते.
१९९० च्या काळात दस्तगीर कॉलनी वसली तेव्हापासून आमचा आणि येथील नागरिकांचा विशेष ऋणानुबंध राहिला आहे. स्व. भाऊसाहेब महाराजांच्या माध्यमातून याठिकाणी मूलभूत सोयीसुविधा मिळाल्या. त्यांच्यापश्चात येथील सर्व प्रकारचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न केले. सौ. लीना गोरे, राजू गोरे यांच्या माध्यमातून या भागाला सक्षम नेतृत्व मिळाले असून संपूर्ण प्रभागातील सर्वप्रकारचे प्रश्न मार्गी लागले आहेत. आमदार फंडातून प्रभागातील सगरे घर ते अवकिरकर घर, मुख्य रस्ता ते आचार्य घर ते मोमीन घर अखेर अंतर्गत रस्त्यांची काँक्रिटीकरण कामे मार्गी लागत आहेत. प्रभागातील सर्वप्रकारची विकास कामे होत आहेत याचे मोठे समाधान आहे, असे आ. शिवेंद्रसिंहराजे म्हणाले.
राजू गोरे यांनी प्रास्ताविक आणि स्वागत केले. दिलीप चरेगावकर यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमास दस्तगिर काॅलनीतील नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
You must be logged in to post a comment.