सातारा जिल्ह्यातील पाणीपुरवठा योजनांचा मंत्री गुलाबराव पाटलांनी घेतला आढावा

सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) : ‘जल जीवन मिशन’ अंतर्गत सातारा जिल्ह्यातील पाणीपुरवठा योजनांचा आढावा पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री गुलाबराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात झालेल्या बैठकीत घेण्यात आला.

‘जल जीवन मिशन’ अंतर्गत प्रत्येक कुटुंबाला सन 2024 पर्यंत घरगुती नळ जोडणीद्वारे पाणीपुरवठा सुविधा उपलब्ध करून द्यावयाची आहे.या अंतर्गत सातारा जिल्ह्यात करावयाच्या कामांसाठी जिल्हा कृती आराखडा व गाव कृती आराखडे तातडीने तयार करणे, शासनाकडे प्रस्ताव सादर करणे या विषयांवर बैठकीत चर्चा करण्यात आली. यावेळी गृह राज्यमंत्री (ग्रामीण) शंभूराज देसाई, पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाचे उप सचिव तथा विशेष कार्य अधिकारी चंद्रकांत गजभिये, सातारा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा  व अन्य अधिकारी  उपस्थित होते.

राज्यात जलजीवन मिशन राबविण्यासाठी 4 सप्टेंबर 2020 रोजीच्या शासन निर्णयात जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनांची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यात यावी, सर्व जिल्ह्यांनी जिल्हा व गाव कृती आराखडा तातडीने सादर करणे, आराखडे बनवतांना पालकमंत्री आणि लोकप्रतिनिधींच्या उपस्थितीत बैठका घेणे, कृती आराखड्यामध्ये द्यावयाच्या नियोजित घरगुती नळजोडण्या व त्यासाठी आवश्यक असणाऱ्या निधीचे त्रैमासिक व वार्षिक नियोजन, गाव कृती आराखडा तयार करण्यासाठी अंमलबजावणी सहाय्य संस्था,ग्रामीण पाणीपुरवठा विभाग किंवा महाराष्ट्र जीवन प्राधिकरण यांची मदत घेणे याबाबतही या बैठकीत चर्चा करण्यात आली.

error: Content is protected !!