अजितदादांच्या आदेशानंतर फलटणला जम्बो कोवीड सेंटर उभारण्याच्या हालचालींना वेग

सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये सातारा जिल्ह्यामध्ये कोरोना बाधित रुग्णांची मोठ्या प्रमाणात संख्या वाढत आहे. या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार आणि आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सातारा जिल्ह्याचा दौरा केला. यावेळी त्यांनी लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाची आढावा बैठक घेतली. यावेळी अजितदादांनी फलटण, माण, खटाव या तालुक्यातील रुग्णांसाठी फलटण परिसरात जम्बो हाॅस्पीटल सुरू करण्याचे आदेश दिले. त्यानंतर जिल्हाधिकारी शेखर सिंग यांनी फलटण तालुक्याचा दौरा करून जम्बो कोवीड सेंटर उभे करण्याच्या दृष्टीने काम सुरू केले आहे.

सातारा येथे झालेल्या कोरोना आढावा बैठकीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दौऱ्यानंतर जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी फलटण तालुक्यात दिवसभर विविध गावांना भेटी देऊन वाढती कोरोना रुग्णसंख्या रोखण्याच्या दृष्टीने आढावा बैठक घेतली. साखरवाडी, हिंगणगाव, गोखळी, विडणी ,निंबळक आदी गावांचा दौरा करून तेथील डॉक्टर ,नर्स, आशा सेविका,कोरोना रुग्ण यांच्याशी प्रत्यक्ष संपर्क साधला.  त्यांच्या अडीअडचणी जाणून घेतल्या विश्रामगृहावर सर्व शासकीय अधिकारी , डॉक्टर यांचे बैठक घेऊन कोरोना रुग्ण संख्या रोखण्याच्या दृष्टीने मार्गदर्शन केले.

 फलटण मध्ये जम्बो हॉस्पिटल वखार महामंडळाच्या गोडाउन मध्ये उभारण्यात येणार असून त्याचा ही आढावा प्रत्यक्ष तेथे जाऊन जिल्हाधिकारी यांनी घेतला. यावेळी आ दीपक चव्हाण, उपविभागीय अधिकारी डॉक्टर शिवाजीराव जगताप, तहसीलदार समीर यादव, उपविभागीय पोलिस अधिकारी तानाजी बर्डे, गट विकास अधिकारी डॉ. अस्मिता गावडे, फलटण नगर परिषदेचे मुख्याधिकारी संजय गायकवाड आदी उपस्थित होते.

error: Content is protected !!