ग्राहकांना अत्याधुनिक बँकींग सुविधा, सभासदांना लाभांश देणार

सातारा,(भूमिशिल्प वृत्तसेवा): येणाऱ्या काळात रिझर्व्ह बँकेच्या मान्यतेने सभासदांना लाभांश देणे. सायबर सिक्युरिटीच्या दृष्टीने बँकेकडील संगणक प्रणाली सुरक्षित असल्याने मोबाईल बँकींगसाठीचा पुर्नप्रस्ताव पाठवून ग्राहकांना अत्याधुनिक बँकींग सेवा उपलब्ध करून देण्याचा निर्धार जनता सहकारी बँकेच्या संचालक मंडळाने केला. त्याचप्रमाणे मार्च २०२४ अखेर सर्वांच्या सहकार्याने एन.पी.ए.चे प्रमाण ४ टक्क्यांपर्यंत आणण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. जिल्हयाची अर्थवहिनी, सर्वसामान्यांची बँक असा नावलौकीक असलेल्या जनता सहकारी बँकेची ६१ वी वार्षिक सर्वसाधारण सभा शनिवारी नवीन कला, वाणिज्य कॉलेज बँकेचे विद्यमान चेअरमन अमोल मोहिते यांच्या अध्यक्षतेखाली झाली. या सभेस बँकेचे सर्व संचालक मंडळ सदस्य व सभासद उपस्थित होते, त्यावेळी हा निर्धार करण्यात आला.

सभेपूर्वी अहवाल सालात दिवगंत झालेले भारतातील सन्मानीय नागरिक, शहीद जवान, बँकेचे सभासद, खातेदार, पदाधिकारी, कर्मचारी व त्यांचे नातेवाईक, यांना संचालक मंडळाने श्रध्दांजली अर्पण केली.

त्यानंतर बँकेचे जेष्ठ संचालक जयेंद्र चव्हाण यांनी बँकेच्या सद्यस्थितीच्या आर्थिक परिस्थितीची माहिती देताना, बँकेने अहवाल सालात बँकेच्या ताळेबंद व नफातोटा पत्रकामध्ये आवश्यक त्या सर्व तरतुदी करून २०२२-२३ या आर्थिक वर्षात १ कोटी ८५ लाख नफा कमवला आहे. बँकेच्या स्थैर्याच्या दृष्टीने अतिशय महत्वाचे असे बँकेचे भांडवल पर्याप्तता प्रमाण (सी.आर.ए.आर.), कमीत कमी ९ टक्के राखणे आवश्यक असताना आपल्या बँकेने हे प्रमाण २२.५६ टक्के असे अतिरीक्त राखलेले आहे. त्याचप्रमाणे बँकेकडील मार्च २०२२ अखेरील निव्वळ एन. पी. ए कर्जाचे प्रमाण १५.१६ टक्के एवढे होते.मात्र अहवाल सालात सर्व संचालक मंडळ सदस्य, अधिकारी, सेवकांच्या नियोजनबध्द थकीत कर्ज वसुली कामकाजामुळे मार्च २०२३ अखेर त्यामध्ये घट होवून ७.३० टक्के एवढे राखण्यात बँक यशस्वी झालेली आहे. मात्र मागील वर्षीप्रमाणे या ही वर्षी वसुलीचे कामकाजाचे नियोजन करून मार्च २०२४ अखेर एन. पी. ए चे प्रमाण ४ टक्के पेक्षा कमी राहील, याची खात्री असल्याचे नमुद केले. मार्च २०२४ अखेर बँक रिझर्व्ह बँकेच्या मार्गदर्शक तत्वांनुसार एफ.एस.डब्ल्यू.एम. चे सर्व निकष पूर्ण करणार आहे.

हिरकमहोत्सवी वर्षानिमित्त अल्प व्याजदराच्या कर्ज योजना जाहीर केल्या असून त्याचा जास्तीत जास्त सभासदांनी लाभ घ्यावा असे आवाहन केले.त्यानंतर श्री. चव्हाण यांनी प्रास्ताविक करुन सभेपुढील सर्व विषयांचे वाचन केले, त्यास सभासदांकडून एकमताने मंजुरी देण्यात आली.

यावेळी सेवानिवृत्त कर्मचारी पेन्शन संघटनेचे सचिव, बँकेचे सभासद वसंतराव विठ्ठल माळी यांनी बँकेकडील विनातारण कर्ज मर्यादेत वाढ करण्याबाबत संचालक मंडळ सदस्यांकडे मागणी केली त्यास श्री. चव्हाण यांनी याबाबत रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया यांच्या कार्यालयाकडे योग्य तो पाठपुरावा सुरू असल्याचे नमूद करून श्री. माळी यांच्या सूचनेची नोंद घेतली.

बँकेचे सभासद सुजित शेख यांनी प्रधानमंत्री जीवन सुरक्षा योजना, प्रधानमंत्री जीवन ज्योती योजना बँकेमार्फत सुरू करावी असे सुचवले. यावर श्री. चव्हाण यांनी या दोन्ही योजनेचा लाभ बँकेच्या खातेदारांना यापूर्वीच उपलब्ध करून दिला असून दरवर्षी विमा नूतनीकरण सुरू असल्याचे सांगितले. तसेच श्री. शेख यांनी एकरक्कमी कर्ज परतफेड योजनेतंर्गत बँकेच्या थकीत सभासद कर्जदारांना दिलेल्या सवलतीची माहिती विचारली असता त्यांना सविस्तर माहिती देण्यात आली. वार्षिक सभेसाठी उपस्थित सभासदांचे संचालक जयेंद्र चव्हाण यांनी आभार मानले.

या सभेस बँकेचे भागधारक पॅनेलप्रमुख, जेष्ठ संचालक विनोद कुलकर्णी, चेअरमन अमोल मोहिते, व्हाईस चेअरमन विजय बडेकर, जेष्ठ संचालिका डॉ. चेतना माजगांवकर, जेष्ठ संचालक जयवंत भोसले, जयेंद्र चव्हाण, आनंदराव कणसे, सुजाता राजेमहाडिक, चंद्रशेखर घोडके, वसंत लेवे, रामचंद्र साठे, अविनाश बाचल, रविंद्र माने, नारायण लोहार, बाळासाहेब गोसावी, वजीर नदाफ, अक्षय गवळी, मच्छद्रिं जगदाळे, सेवक संचालक अन्वर सय्यद, अभिजीत साळुंखे, बँकेचे जेष्ठ सभासद ॲड. सुभाष मुंढेकर, ॲड. गोकुळ सारडा उपस्थित होते.

सभा यशस्वितेसाठी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल जठार, मुख्य कार्यालयातील सर्व विभागप्रमुख तसेच बॅकेतील सर्व अधिकारी, सेवक वर्ग यांनी परिश्रम घेतले.

error: Content is protected !!