सातारा, (भूमीशिल्प वृत्तसेवा) : खटाव तालुक्यासाठी वरदायिनी असलेल्या “जिहे-कठापुर” योजनेच्या पूर्णत्वासाठी व अजूनही योजनेत समाविष्ट न झालेल्या गावांचा समावेश करण्याविषयी बैठक आयोजित करण्याचा आग्रह आमदार शशिकांत शिंदे यांनी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्याकडे मागणी केली होती. त्यानुसार जयंत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात बैठक पार पडली. यावेळी येरळा नदी उगम ते नेर मध्यम प्रकल्प या दरम्यान येणाऱ्या गावांचा समावेश या योजनेत व्हावा असा आग्रह धरला.
मांजरवाडी, मोळ, अनपटवाडी, ललगुण सह डोंगर माथ्यावरील गावे कायम दुष्काळी असून येरळा नदीत पाणी साठून राहत नसल्याने या गावांचा पिण्यासाठी व शेतीसाठी लागणाऱ्या पाण्याचा प्रश्न गंभीर आहे त्यामुळे जिहे कठापुर योजनेत या गावांचा समावेश व्हावा ही प्रमुख मागणी केली. त्याचबरोबर योजनेच्या यांत्रिकीकरण विभागात व शासकीय सेवेत ठेकेदाराकडून कामावर असलेल्या कंत्राटी कामगारांचे प्रश्न बैठकीदरम्यान उपस्थित केले.
सातारा, कृष्णानगर येथे विद्युतविभागाचे कार्यालय व्हावे अशी अपेक्षा व्यक्त केली. यावेळी कोयना प्रकल्पग्रस्तांसाठीचे प्रश्न देखील उपस्थित केले. बैठकीस जलसंपदा विभागाचे सचिव, कृष्णा खोरे महामंडळाचे कार्यकारी संचालक, मुख्य अभियंता, अधीक्षक अभियंता, कार्यकारी अभियंता, व विषयाशी संबंधित इतर स्थानिक अधिकारी ऑनलाईनद्वारे उपस्थित होते. मंत्री महोदयांनी सर्व मागण्यांचा सकारात्मक विचार करत आढावा घेऊन तीन दिवसात प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना केल्या.
या योजनेद्वारे नेर तलावात पाणी सोडण्यासाठी ऊर्ध्वनलिकेबाबत यांत्रिकी स्थापत्य व विद्युत विभागाची कामे पूर्णत्वाकडे जात असून जुलै अखेर याची चाचणी घेण्याचे प्रयोजन आहे. यशस्वी चाचणीनंतर योजनेचे पाणी नेर धरणात सोडले जाईल.
You must be logged in to post a comment.