जिल्ह्यातील उद्योजकांनी स्थानिकांनाच रोजगार द्यावा

ऑनलाईन रोजगार मेळाव्यात पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांचे आवाहन 
सातारा (भूमिशिल्प वृत्तसेवा) : ’कोरोनाचा संसर्ग वाढू नये म्हणून जाहीर करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे अनेक उद्योग, व्यवसाय बंद करण्यात आले. त्यामुळे मुंबई, पुणे व परराज्यात काम करणारे मूळचे सातार्‍याचे नागरिक जिल्ह्यात परतले आहेत. उद्योजकांनी सकारात्मक भूमिका घेऊन या स्थानिकांनाच रोजगार उपलब्ध करुन द्यावा,’ असे आवाहन पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी केले.
कौशल्य विकास व उद्योजकता विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात आयोजित ऑनलाईन रोजगार मेळाव्याचे उद्घाटन पालकमंत्री पाटील यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमास गृह (ग्रामीण) तथा कौशल्य विकास राज्यमंत्री शंभूराज देसाई यांची प्रमुख उपस्थिती होती. याप्रसंगी जिल्हाधिकारी शेखर सिंह, मुख्य कार्यकारी अधिकारी संजय भागवत, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष धोत्रे, कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागाचे सहायक आयुक्त सचिन जाधव, जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक संदीप रोकडे, जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी सचिन धुमाळ यांच्यासह उद्योजक व त्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
लॉकडाऊनमुळे आज उद्योग क्षेत्र काही प्रमाणात अडचणीत आले आहे. मात्र हे क्षेत्र पुन्हा उभे राहिले पाहिजे ही शासनाची भूमिका असल्याचे सांगून पालकमंत्री पाटील पुढे म्हणाले, ’मुंबईत सातारा जिल्ह्यातील नागरिक मोठ्या प्रमाणात कामासाठी गेले होते परंतु लॉकडाऊनमुळे ते जिल्ह्यात परतले आहेत. त्यांच्या हातांना काम नाही. त्यामुळे त्यांची कोणतेही काम करण्याची मानसिकता तयार झाली आहे. आज आणि उद्या होणार्‍या रोजगार मेळाव्याच्या माध्यमातून उद्योजकांनी स्थानिकांना रोजगार मिळवून द्यावा.’
1 हजार 277 जागांसाठी ऑनलाईन मुलाखती
गुरुवारी आणि शुक्रवारी 1 हजार 277 जागांसाठी ऑनलाईन मुलाखती घेण्यात येणार आहेत. या जागांसाठी जिल्ह्यातून 4 हजार 500 जणांची नोंदणी केलेली आहे. या पुढे उद्योगांना कामगारांची गरज असल्यास त्यांनी कौशल्य विकास विभागाच्या संकेतस्थळावर जावून किती कामगारांची गरज आहे याची नोंदणी करावी. उद्योजकांनी जिल्ह्यातील जास्तीत जास्त बेरोजगारांना रोजगार मिळेल हा हेतू ठेवावा, असे जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी यावेळी सांगितले.
उद्योजकांकडून प्रशासनाचे कौतुक
लॉकडाऊनमुळे जिल्ह्यातील उद्योग बंद पडले होते. या काळात प्रशासनाने उद्योगांबाबत सकारात्मक प्रतिसाद दिला तसेच या कठीण काळात वेळोवेळी मार्गदर्शन करुन लॉकडाऊनमध्ये शिथिलता देण्यात आल्यानंतर उद्योग सुरु करण्याबाबत जिल्हा प्रशासनाने प्रोत्साहन दिले. रोजगार मेळाव्याच्या माध्यमातून जिल्ह्यातील बेरोजगारांना रोजगार उपलब्ध करुन दिला जाईल, असे विविध उद्योगांच्या प्रतिनिधींनी यावेळी सांगितले. यावेळी पालकमंत्री बाळासाहेब पाटील व गृहराज्यमंत्री (ग्रामीण) शंभूराज देसाई यांच्या हस्ते काही जणांना प्राथमिक स्वरुपात नियुक्ती पत्रांचेही वाटप करण्यात आले.

उद्योजकांनी सकारात्मक भूमिका दाखवावी : ना. शंभूराज देसाई
कौशल्य विकास विभागाने स्थानिक बेरोजगार युवकांना रोजगार कशा प्रकारे मिळेल यासाठी आराखडा तयार केला होता पण कोरोनाच्या संसर्गामुळे हा आराखडा राबविण्यात अडचणी निर्माण झाल्या मात्र तयार करण्यात आलेला आारखडा भविष्यात राबविण्यात येणार आहे. आज मुंबई, पुणे येथून नागरिक आपल्या जिल्ह्यात परत आले आहेत. त्यांना गावाकडेच काम मिळावे, अशी अपेक्षा ते व्यक्त करत आहेत. याचा लाभ उद्योजकांनी घेऊन एक पाऊल पुढे येऊन भूमिपुत्रांना रोजगार उपलब्ध करुन देण्यासाठी सकारात्मक भूमिका घ्यावी, असे आवाहन गृहराज्यमंत्री (ग्रामीण) देसाई यांनी केले.




error: Content is protected !!