ज्योतिर्मय महोत्सव सातारकरांसाठी पर्वणी : याशनी नागराजन

जिल्हा परिषदेच्या मैदानावर पाच दिवस भव्य प्रदर्शन व विक्री

सातारा,(भूमिशिल्प वृत्तसेवा) : ज्योतिर्मय फांउडेशनच्यावतीने आयोजित केलेला ज्योतिर्मय महोत्सव म्हणजे सातारकरांसाठी गौरवाची बाब व पर्वणीच आहे. जिल्ह्यामध्ये २० हजारांहून जास्त महिला बचतगट आहेत. त्यांच्या उत्पादनांना बाजारपेठ मिळवून देण्याचे काम हा महोत्सव गेली ११ वर्षे करत आहे. पाच दिवस सुरू राहणार्‍या या महोत्सवाचा लाभ सातारकरांनी घ्यावा, असे आवाहन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन यांनी केले.

साताऱ्यातील जिल्हा परिषदेच्या मैदानावर आयोजित केलेल्या ज्योतिर्मय महोत्सव २०२४ च्या उद्घाटन प्रसंगी त्या बोलत होत्या. यावेळी शिवसेनेचे माजी जिल्हाध्यक्ष नरेंद्र पाटील, पृथ्वीराज पाटील, काका पाटील, अ‍ॅड. भरत पाटील, माजी नगरसेविका सविताताई फाळके, उमेश पाटील, कार्यकारिणी सदस्या राजश्री दोशी, भाजपचे शहराध्यक्ष विकास गोसावी,दिप्ती पवार, सईदा नदाफ, अ‍ॅड. अंजुम मणेर, मल्लिका पुजारी, रेणुका शेटे, राधिका पाटील, स्मिता शिंगटे, रिना भणगे, सीमा भाटिया यांची प्रमुख उपस्थिती होती.

ज्योतिर्मय महोत्सवामध्ये कन्झ्युमर, बचतगट, फूड असे एकूण २०० स्टॉल्स लागले आहेत. सातारा, कोल्हापूर, सोलापूर, जळगाव, नाशिक येथील स्टॉलधारक या महोत्सवामध्ये उत्साहाने सहभागी झाले असून पहिल्याच दिवशी महोत्सव पाहण्यासाठी सातारकरांनी मोठी गर्दी केली होती. विविध वस्तूंच्या स्टॉलवर गर्दी करुन सातारकर खरेदी करताना पहायला मिळत होते.एकाच प्रदर्शनात ऑटोमोबाईल, कृषी, हॅण्डीक्राफ्ट, होम अप्लायंसेस, बचतट व फूड स्टॉल्स पहायला मिळत आहेत.यावेळी याशनी नागराजन यांनी स्टॉल्सची पाहणी देखील केली.

दरम्यान, शुक्रवार दि. ६ ते मंगळवार, दि.१० डिसेंबरपर्यंत सुरु राहणार्‍या या महोत्सवामध्ये येणार्‍या ग्राहकांसाठी मराठी व हिंदी नवीन जुन्या गाण्यांचा कार्यक्रम, महिलांसाठी होम मिनिस्टर, लावणी, महिला व युवती यांच्यासाठी फॅशन शो, सरगम द फ्युजन बँड संगीत कार्यक्रम आयोजित केले असून याचा लाभ सातारकरांनी घ्यावा, असे आवाहन आयोजकांच्यावतीने करण्यात आले आहे.

error: Content is protected !!