कचरावेचकांच्या पायांना आता पावसाळी बुटांचं कवच !

कर्तव्य सोशल ग्रुपच्या संस्थापिका वेदांतिकाराजे भोसले यांच्यातर्फे वाटप
सातारा (भूमिशिल्प वृत्तसेवा) : रस्त्यावर टाकण्यात आलेला ओला-सुका कचरा असो किंवा ओढ्या- नाल्यांत फेकण्यात आलेल्या प्लास्टिक बाटल्या, आणि पिशव्या असो; हा सारा कचरा स्वतःच्या हातांनी उचलून त्याची योग्यप्रकारे विल्हेवाट लावण्याचे काम करणारे ’स्वच्छतादूत’ म्हणजेच कचरावेचक. पावसाळ्यात त्यांच्या आरोग्याचे संरक्षण व्हावे म्हणून येथील कर्तव्य सोशल ग्रुपच्या संस्थापिका वेदांतिकाराजे भोसले यांच्यातर्फे 74 कचरावेचकांना पावसाळी बुटांचे वाटप करण्यात आले.
‘कचरावेचक हा सुध्दा माणूसच आहे. त्यामुळे समाज व नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेणार्‍या कचरावेचकांनी स्वत:च्या आरोग्याचीही काळजी घ्यावी. खास करुन त्यांनी पावसाळ्यात आपले आरोग्य जपावे,’ असे आवाहन वेदांतिकाराजे भोसले यांनी केले. पावसाळ्यात पायांना संरक्षण मिळावे म्हणून सातारा शहरात कचरा गोळा करणार्‍या 74 कचरावेचकांना सौ. वेदांतिकाराजे यांच्यातर्फे पावसाळी बुटांचे मोफत वाटप करण्यात आले. यावेळी त्या बोलत होत्या. याप्रसंगी नगर विकास आघाडीचे प्रतोद अमोल मोहिते उपस्थित होते.
आज कोरोनापासून बचावासाठी वारंवार हात स्वच्छ धुणे, मास्क वापरणे अनिवार्य झाले आहे. कचरावेचकांनी जर कचराच उचला नाही तर आपल्या शहराची अवस्था काय होईल ? एक इंचही जागा मोकळी राहणार नाही. त्यामुळे कचरावेचकांचे कार्य खूप महान आहे. त्यांच्या कार्याचे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे. पावसाळ्यातही त्यांचे कार्य सुरू असते. संपूर्ण शहराच्या आरोग्याची काळजी घेणार्‍या कचरावेचकांनी स्वत:च्याही आरोग्याची काळजी घेणे अत्यावश्यक आहे. यासाठी त्यांनी सतर्क राहावे,’ असे आवाहनही वेदांतिकाराजे भोसले यांनी केले.




error: Content is protected !!