सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) : कऱ्हाड शहरातील बुधवार पेठेत रविवारी पहाटेच्या सुमारास रस्त्यात डीजे लाऊन धिंगाणा घालणाऱ्या युवकांना पोलिसांनी हटकले असताना शिविगाळ, दमदाटी करीत संबंधित युवकांनी पोलिसांवरच दगडफेक केल्याची घटना घडली. याप्रकरणी सोळवंडे टोळीतील तेराजणांवर कऱ्हाड शहर पोलिसात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
प्रद्युम्न ऊर्फ पद्या सोळवंडे (रा. बुधवार पेठ, कऱ्हाड) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. पसार झालेल्या त्याच्या साथिदारांचा पोलीस शोध घेत असून रात्री उशिरापर्यंत आरोपींची धरपकड सुरू होती. या घटनेने शहरात काहीकाळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरातील अंडी चौक ते बुधवार पेठ जाणाऱ्या मार्गावर रविवारी पहाटे काही युवक डीजे लाऊन धिंगाणा घालत होते. याबाबतची माहिती पोलीस ठाण्यात समजल्यानंतर रात्रगस्तीचे अधिकारी व कर्मचारी तातडीने त्याठिकाणी पोहोचले. त्यावेळी रस्त्यावरच डीजे लाऊन काही युवक नाचत असल्याचे पोलिसांना दिसले. पोलिसांनी त्यांना हटकले. तसेच डीजे बंद करण्याची सूचना दिली. मात्र, पोलिसांना न जुमानता युवकांचा नाच सुरूच होता. पोलिसांनी ताकीद दिल्यानंतर युवकांनी पोलिसांना शिविगाळ, दमदाटी करण्यास सुरूवात केली. तसेच त्याठिकाणची लाईट अचानक बंद करून पोलिसांवर दगड भिरकावले. त्यामुळे पोलिसांचीही धावपळ उडाली. घटनेची माहिती मिळाल्यानंतर तातडीने आणखी पोलीस बंदोबस्त मागविण्यात आला. मात्र, तोपर्यंत दगडफेक करणारे युवक पसार झाले होते. या घटनेने परिसरात काहीकाळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. रविवारी याप्रकरणी पोलिसांनी प्रद्युम्न ऊर्फ पद्या सोळवंडे याला अटक केली आहे. त्याच्या इतर साथिदारांचा पोलिसांकडून शोध घेतला जात आहे. याप्रकरणी कºहाड शहर पोलिसात तेराजणांवर गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक अमित बाबर तपास करत आहेत.
You must be logged in to post a comment.