रयत शिक्षण संस्थेतर्फे साताऱ्यात शुक्रवारी कर्मवीर जयंती कार्यक्रम

सातारा,(भूमिशिल्प वृत्तसेवा): रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक पद्मभूषण डॉ.कर्मवीर भाऊराव पाटील यांची १३६ वी जयंती साजरी होत आहे.रयत शिक्षण संस्था आणि संस्थेच्या सातारा शहर परिसरातील स्थानिक शाखांच्यावतीने शुक्रवार २२ सप्टेंबर रोजी या निमित्ताने विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती संस्थेचे सचिव विकास देशमुख यांनी दिली.

कर्मवीर डॉ.भाऊराव पाटील यांच्या जयंतीनिमित्त पुढील कार्यक्रम होणार आहेत.दि.२२ सप्टेंबर रोजी सकाळी ७ वाजता संस्थेचे सर्व पदाधिकारी, सेवक, विद्यार्थी यांच्यावतीने कर्मवीर समाधीस अभिवादन करण्यात येईल. त्यानंतर कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या शेवरो लेट या गाडीसह कर्मवीरांच्या तैलचित्रासह चित्ररथ, विद्यार्थी व रयत सेवक प्रभात फेरीत सहभागी होणार आहेत. यावेळी सातारा शहरातील महापुरुषांच्या पुतळ्यांना संस्थेचे चेअरमन चंद्रकांत दळवी, सचिव विकास देशमुख,सहसचिव प्राचार्य ज्ञानदेव म्हस्के,सहसचिव बी.एन. पवार, ऑडीटर प्राचार्य डॉ. शिवलिंग मेनकुदळे हे पुष्पहार घालून अभिवादन करणार आहेत.

कर्मवीर जयंतीचा मुख्य कार्यक्रम सकाळी ११ वाजता कर्मवीर समाधी परिसरात आयोजित केला आहे.रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन चंद्रकांत दळवी यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होणाऱ्या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून राज्याचे शिक्षण आयुक्त सूरज मांढरे हे उपस्थित राहणार आहेत. यावेळी रयत शिक्षण संस्थेचे व्हा.चेअरमन ॲड.भगीरथ शिंदे, संघटक डॉ. अनिल पाटील हे उपस्थित राहणार आहेत.

कर्मवीर जयंतीच्या निमित्ताने दि रयत सेवक को-ऑप बँकेच्या वतीने दु. ३ वा. भिमाबाई आंबेडकर कन्या विद्यामंदिरच्या विद्यार्थिनींच्या हस्ते आर्यांग्ल हॉस्पिटल, अण्णासाहेब कल्याणी विद्यालयाच्या विद्यार्थ्यांच्या हस्ते सायं.४ वाजता क्रांतिसिंह नाना पाटील शासकीय रुग्णालयातील रुग्णांना फळे व गुलाबपुष्प देऊन शुभेच्छा देण्यात येणार आहेत.

रयत सेवक को-ऑप बँकेचे कर्मचारी शाहूबोर्डिंग शाखा नं. १ व २, लक्ष्मीबाई भाऊराव पाटील वसतीगृहातील विद्यार्थिनीना फळे वाटप करणार आहेत.

शुक्रवार २९ सप्टेंबर रोजी छत्रपती शिवाजी कॉलेजमध्ये रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आलेले आहे.या रक्तदान शिबिरासाठी संस्थेच्या यशवंतराव चव्हाण इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स,धनंजयराव गाडगीळ वाणिज्य महाविद्यालय,आझाद कॉलेज ऑफ एज्युकेशन, सावित्रीबाई फुले महिला महाविद्यालय, कर्मवीर भाऊराव पाटील अभियांत्रिकी महाविद्यालय, इस्माईल मुल्ला लॉ कॉलेज, वर्ये येथील कर्मवीर भाऊराव पाटील इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज अँड रिसर्चचे विद्यार्थी सहभागी होणार आहेत.

या सर्वच उपक्रमांना सातारा शहरातील शिक्षणप्रेमी, सातारकर नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे,असे आवाहन रयत शिक्षण संस्थेचे सचिव विकास देशमुख यांनी केले आहे.

error: Content is protected !!