सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) – सातारकरांचा जीवनदाता असलेल्या कास धरणाची उंची वाढवण्याचे काम सुरू आहे. या कामाचीआमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी आज या प्रकल्पस्थळी भेट देऊन पाहणी केली.
कास धरणाची उंची १२.४२ मीटर वाढवण्याचे काम युद्धपातळीवर सुरु असून उंची वाढवल्यानंतर या धरणात ५०० दलघनफूट पाणीसाठा होणार आहे. प्रकल्पाचे काम वेळेत पूर्ण व्हावे, काम दर्जेदार व्हावे यासाठी आ. शिवेंद्रसिंहराजे नेहमीच लक्ष देत असून त्यांनी आज सकाळी या प्रकल्पाची पाहणी केली. यावेळी नगरसेवक अमोल मोहिते, शकील बागवान, रविंद्र ढोणे, राजू गोरे यांच्यासह पाटबंधारे विभागाचे अधीक्षक अभियंता प्रकाश मिसाळ, उरमोडी धरण विभागाचे कार्यकारी अभियंता महादेव धुळे, कास प्रकल्पाचे उप अभियंता जयवंत बर्गे, शाखा अभियंता आरिफ मोमीन आदी उपस्थित होते.
प्रकल्पाचे काम अंतिम टप्प्यात असून मूळ धरणाच्या शीर्ष विमोचक विहिरीचे काम पूर्ण झाले आहे. सांडव्याचे (ओव्हर फ्लो सेक्शन) बांधकाम सुरु असून दोन्ही बाजूच्या संरक्षक भिंतींचे कामही सुरु आहे. लवकरच काम पूर्ण होऊन पावसाळ्यानंतर येत्या नोव्हेंबर- डिसेंबरमध्ये धरण पूर्णक्षमतेने भरेल अशी माहिती उपस्थित अधिकाऱ्यांनी दिली. या प्रकल्पामुळे संपूर्ण सातारा शहराचा आणि कास मार्गावरील १५ गावांचा पाणीप्रश्न कायमचा सुटणार आहे. त्यामुळे काम लवकरात लवकर पूर्ण करा. कामाच्या दर्जाबाबत तडजोड करू नका अशा सक्त सूचना आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी अधिकाऱ्यांना केल्या.
You must be logged in to post a comment.