सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) : कास धरण उंची वाढवण्याच्या तिसऱ्या व शेवटच्या टप्यातील कामाचा आज शुभारंभ खासदार उदयनराजे भोसले यांच्या हस्ते करण्यात आला.
कास धरणाच्या पूर्णत्वास गेलेल्या आणि अंतिम टप्यात करावयाच्या कामाची पहाणी केली. यावेळी जलसंपदा विभागाचे कार्यकारी संचालक विलास रजपूत, मुख्य अभियंता जलसंपदा श्री हेमंत धुमाळ, अधिक्षक अभियंता डोईफोडे, अधिक्षक अभियंता सार्व बांधकाम विभाग श्री.मुंगेरवार, उरमोडी धरण विभागाचे कार्यकारी अभियंता श्री.विकास पाटील यांचेसह सातारा नगरपरिषदेचे पदाधिकारी नगरसेवक, नगरसेविका, कास ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कास धरण उंची वाढवण्याची संकल्पना सातारचे पहिले लोकनियुक्त नगराध्यक्ष स्व.श्रीमंत छत्रपती प्रतापसिंहमहाराज उर्फ दादा महाराज यांनी साकारली होती. त्यांची संकल्पना अस्तित्वात येत आहे याचा मनस्वी आनंद आहे. कास येथे बोटिंग, व्हिव्हींग गॅलरी उभारणे इत्यादी प्रस्ताव लवकरच मंजूर करुन घेवून, स्थानिकांच्या रोजगार वाढीचे सर्व प्रयत्न केले जातील.
सुमारे १८५३ च्या सुमारास श्रीमंत छत्रपती प्रतापसिंहमहाराज (थोरले) यांनी मुळचे कास धरण साकारण्याचे सर्वप्रथम प्रयत्न केले, तसेच स्व.दादामहाराज हे सातारा नगरपरिषदेचे पहिले लोकनियुक्त नगराध्यक्ष असताना, मुळ धरणाची उंची वाढवण्याची आणि कास बंदिस्त पाईपलाईनची संकल्पना मांडली होती.
कास बंदिस्त पाईपलाईनची संकल्पना आम्ही कृष्णा खोरे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष आणि पुढे महसुल राज्यमंत्री असताना साकारली. कास धरणाच्या उंची वाढवण्याच्या कामास देखिल सुमारे दोन वर्षापूर्वी सुरुवात करण्यात आली आहे. या उंची वाढवण्याच्या कामापैकी ८० टक्क्यापेक्षा जास्त काम पूर्ण ल झाले आहे.
शेवटच्या टप्यातील पावसाळ्यानंतरच्या कामाचा आज शुभारंभ होत आहे. लवकरच म्हणजे येत्या दोन-तीन महिन्यात हे काम पूर्ण होईल अशी अपेक्षा आहे. पूर्णपणे ग्रॅव्हीटीने सुमारे २७ किलोमिटरपेक्षा जास्त अंतरावरून, नैसर्गिक उताराने कासचे पाणी अहोरात्र सातारकरांची तान भागवत आहे. आता कास धरण क्षमतेत भक्कम वाढ होत असल्याने, सातारकरांना पाण्याची कमतरता भासणार नाही याचे समाधान आहे.
सातारा जिल्ह्याला निसर्गाचे वरदान लाभले आहे. त्याचा पर्यटनाच्या दृष्टीने स्थानिकांना लाभ मिळेल अश्या दृष्टीकोनामधुन या ठिकाणी बोटींग, तसेच व्हीव्हिंग गॅलरी उभारण्यात येणार आहे. जेणेकरुन शास्त्रीय दृष्टीकोनामधुन पर्यटकांना येथील निसर्गसंपन्नतेचा अनुभव घेता येईल आणि स्थानिकांनाही भक्कम रोजगाराची संधी उपलब्ध होईल असे प्रयत्न आमचे सुरु आहेत. लवकरच त्या कामांचा देखिल शुभारंभ होईल असा विश्वास आहे. त्याचबरोबरीने स्थानिक ग्रामस्थांचे विविध प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही कटीबध्द आहोत. कास धरण उंची वाढवताना ग्रामस्थांच्या सुविधेचे जे प्रश्न आहेत ते निश्चितपणे प्राधान्याने सोडवण्यात आले आहेत, राहीलेले प्रश्न देखिल प्राधान्याने सोडवले
जातील.
मुंबई-पुण्यासह देशभरातुन आणि जगातुन कास व्हॅलीचे दर्शनास पर्यटक येत असताना, त्यांना कोणत्याही त्रासाशिवाय सर्व सुविधा देता आल्या तर या भागाचा निश्चितच पर्यटनाच्या दृष्टीने कायापालट होवून, महाबळेश्वर नंतरचे फेव्हरेट डेस्टीनेशन कास ठरेल यामध्ये आमच्या मनात शंका नाही.
You must be logged in to post a comment.