कास धरण उंची वाढवण्याच्या कामाचा शिवेंद्रसिंहराजेंनी घेतला आढावा

सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) – वाढीव निधी मिळत नसल्याने सातारकरांचा जीवनदाता असलेल्या कास धरणाच्या उंची वाढवण्याच्या कामाला ब‘ेक लागला होता. उपमुख्यमंत्री अजित पवारांनी या प्रकल्पाला मंजूरी दिली होती. काही दिवसांपुर्वी कास धरण प्रकल्पासाठी वाढीव ५७.९१ कोटी निधी मंजूर करून दिला. आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी बुधवार दि. २० रोजी कृष्णानगर येथील जलसंपदा विभागाच्या कार्यालयात कास धरण प्रकल्पाच्या कामाचा आढावा घेतला.

यावेळी जलसम्पदा विभागाचे अधीक्षक अभियंता प्रकाश मिसाळ, सातारा नगर पालिकेचे मुख्याधिकारी अभिजित बापट, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य राजू भोसले यांच्यासह संबंधित सर्व अधिकारी, कर्मचारी  उपस्थित होते.

कास धरण उंची वाढवण्याचे काम वाढीव निधी अभावी रखडले होते. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सहकार्यामुळे या प्रकल्पासाठी वाढीव ५७.९१ कोटी रुपये निधी उपलब्ध झाला आहे. कास धरण प्रकल्प हा सातारा शहर आणि कास परिसरातील आसपासच्या १५ गावांसाठी महत्वाचा आहे. यासाठी निधी उपलब्ध झाला असून हा जिव्हाळ्याचा प्रकल्प तातडीने पूर्ण झाला पाहिजे. उर्वरित राहिलेले काम पाहता येत्या १५ मे पर्यंत कास धरणाची उंची वाढवण्याचे काम पूर्ण करा, अशा सूचना आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांना केल्या.

सर्व प्रकारचे शासकीय सोपस्कार पूर्ण करून तातडीने  कामाला प्रारंभ करा. राहिलेली कामे त्वरित हाती घेऊन ती लवकरात लवकर पूण करा. या प्रकल्पाचे काम दर्जेदार करून ते वेळेत पूर्ण करा आणि या भव्यदिव्य प्रकल्पाला सातारकरांच्या सेवेत लवकर रुजू करा, अशा सूचना आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी अधिकाऱ्यांना केल्या.  

error: Content is protected !!