सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) : मागील चार दिवसांपासून सातारा जिल्ह्यात पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे सातारा शहराला पाणी पुरवठा करणारा कास धऱण भरला आहे. धरणात १०७ दशलक्ष घनफूट पाणीसाठा निर्माण झाला आहे. धऱणातून १३५ क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. धरण भरल्यामुळे साताऱ्याचा पाणीप्रश्न मिटला आहे. गेल्या पंधरा दिवसांत तळ गाठलेला कास तलाव भरून वाहू लागल्याने नगरपालिका पदाधिकाऱ्यांनीही सुटकेचा नि:श्वास टाकला.
कास तलावाच्या माध्यमातून प्रामुख्याने शहराच्या पश्चिम भागातील व्यंकटपुरा पेठ, मंगळवार पेठ, शुक्रवार पेठ, रामाचा गोट, प्रतापगंज पेठ, शनिवार पेठ या परिसराला पाणीपुरवठा केला जातो. व्यंकटपुरा तसेच शुक्रवार पेठेतील काही परिसराला महादरे तलावातूनही पाणी दिले जाते. मात्र, महादरे आटल्यानंतर या सर्व पेठांची भिस्त कास तलावावरच होती. कास तलावातून त्या परिसरातील काही गावांनाही पाणीपुरवठा केला जातो. या गावांनाही टंचाईच्या झळा सहन कराव्या लागणार होत्या. मात्र, तलाव भरल्याने चिंता दूर झाली आहे.
आठ दिवसांपूर्वी तलावात जेमतेम पाच फूट पाणीच शिल्लक होते. आठ-दहा दिवस पुरेल एवढाचा पाणीसाठा राहिल्याने पदाधिकाऱ्यांमध्ये अस्वस्थता पसरली होती. त्यांनी दिवसांआड पाणी सोडण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, गेल्या चार दिवसांपासून कास तलाव पाणलोट क्षेत्रात पावसाची संततधार सुरू आहे. त्यामुळे कास तलाव गुरुवारी रात्री साडेआठ वाजता भरून वाहू लागला. ब्रिटिशकालीन असलेल्या या कास तलावातून शहरास सायफन पद्धतीने पाणी येते. देशातील पिण्याच्या पाण्याच्या जलस्त्रोतांमध्ये कास तलावातील पाण्याने शुद्धतेच्या बाबतीत पहिल्या पाच क्रमांकामध्ये स्थान मिळवले होते. त्यामुळे कास पाणीयोजनेला विशेष महत्त्व आहे.
You must be logged in to post a comment.